सर्वांना आनंदाने साहाय्‍य करणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. प्रियांका लोणे !

धर्मप्रेमींना धर्मकार्याशी जोडून ठेवणार्‍या आणि सर्वांना आनंदाने साहाय्‍य करणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. प्रियांका लोणे !

कु. प्रियांका लोणे

१. श्री. दिनेश बाबते, संभाजीनगर

१ अ. सकारात्‍मकता : ‘कु. प्रियांकाताई प्रत्‍येक प्रसंगात सदैव सकारात्‍मक रहाते. तिला कुठलीही अडचण सांगितली, तर ती सकारात्‍मक राहून ऐकते आणि अडचण सोडवण्‍याचा प्रयत्न करते. त्‍यामुळे मला तिच्‍या समवेत सेवा करतांना ताण जाणवत नाही.

१ आ. नेतृत्‍वगुण

अ. कु. प्रियांकाताईच्‍या समवेत ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’च्‍या वेळी सेवा करतांना मला तिच्‍यातील नेतृत्‍वगुण प्रकर्षाने अनुभवता आला. ती तिच्‍या संपर्कात असलेल्‍या गावातील धर्मप्रेमींना सभेतील नियोजनाचे काही दायित्‍व देऊन त्‍यांना धर्मकार्यात सहभागी करून घेते. ती हे फार सहजतने करते. यासाठी ‘ती पुष्‍कळ तळमळीने प्रयत्न करते’, असे मला जाणवते.

आ. प्रियांकाताई धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्‍या प्रकृतीनुसार त्‍यांची सेवेसाठी निवड करते. प्रत्‍येकातील गुण आणि कौशल्‍य यांनुसार ती त्‍यांना धर्मकार्यात सहभागी करून घेते.

इ. प्रियांकाताई धर्मप्रेमींना सेवा करण्‍यासाठी प्रोत्‍साहित करते.

१ इ. उत्तम संपर्क कौशल्‍य : तिला प्रसारामध्‍ये जोडलेल्‍या गावांविषयीची संपूर्ण माहिती असते. त्‍या गावची लोकसंख्‍या, सामाजिक स्‍थिती, धार्मिक स्‍थिती, गावातील संत, मठ इत्‍यादी सर्व तिच्‍या लक्षात असते.

१ ई. संघटन कौशल्‍य : प्रियांकाताई गावातील मान्‍यवरांच्‍या माध्‍यमातून इतर मान्‍यवरांना हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याशी जोडण्‍यासाठी तळमळीने प्रयत्न करते.’

२. सौ. अक्षरा बाबते (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), संभाजीनगर

२ अ. कार्यकर्त्‍यांना आधार वाटणे : ‘प्रियांकाताईने कुठल्‍याही नवीन सेवेविषयी विचारल्‍यावर कार्यकर्ते पटकन् होकार देतात. ती समवेत असल्‍यामुळे कार्यकर्त्‍यांना सेवा करतांना तिचा आधार वाटतो.

२ आ. सेवेची तळमळ : जिल्‍ह्यातील कार्यकर्ते कृतीशील होण्‍यासाठी आणि कार्यकर्त्‍यांमधील गुणवृद्धीसाठी तिने कार्यशाळा घेतल्‍या. तिने कार्यकर्त्‍यांची व्‍यष्‍टी अणि समष्‍टी साधना यांची घडी बसवली. तिच्‍यातील नियोजन कौशल्‍य आणि तिने तळमळीने केलेले प्रयत्न यांमुळे कार्यकर्त्‍यांची फलनिष्‍पती वाढली आहे.

२ इ. प्रियांकाताईमध्‍ये जाणवलेले पालट

२ इ १. कार्यकर्त्‍यांप्रती प्रेमभाव वाढल्‍याचे जाणवणे : ‘प्रियांकाताई नेहमी धर्मप्रेमींचेच कौतुक करते. तिला कार्यकर्त्‍यांविषयी ठाऊक नसते’, असे मला वाटायचे; पण गेल्‍या काही मासांंपासून ‘तिचा कार्यकर्त्‍यांप्रतीचा प्रेमभाव पुष्‍कळ वाढला आहे’, असे मला जाणवते. आता ती कार्यकर्त्‍यांना समजून घेते. विशेष करून सध्‍याच्‍या कोरोनाच्‍या साथीच्‍या परिस्‍थितीत कार्यकर्त्‍यांना तिचा फार आधार वाटतो.

२ इ २. मोकळेपणे बोलणे वाढल्‍यामुळे आध्‍यात्मिक मैत्री होणे : आधी प्रियांकाताई माझ्‍याशी केवळ सेवेपुरतेच बोलायची. मनमोकळेपणे बोलत नव्‍हती; पण आता तिच्‍यात पुष्‍कळ पालट जाणवतो. आता ती माझी एक आध्‍यामिक मैत्रीण झाली आहे.

२ इ ३. ‘इतरांचा विचार आणि इतरांना साहाय्‍य करणे’, हे दोन्‍ही गुण वाढल्‍याचे जाणवणे

अ. निवासासाठी ती आमच्‍या घरी आल्‍यावर ‘ती आणि तिची सेवा’ असेच असायचे. आता यात पुष्‍कळ पालट जाणवत आहे. आता ती स्‍वतःच्‍या सेवा सांभाळून आम्‍हाला तत्‍परतेने सेवेमध्‍ये साहाय्‍य करते.

आ. आरंभी कुठल्‍याही सूत्राविषयी ती तिचे मत मांडायची आणि त्‍यावर ठाम रहायची; पण आता ती सकारात्‍मक राहून इतरांचा विचार करते. त्‍यांच्‍या अडचणी जाणून कृती करते.

२ इ ४. भावाच्‍या स्‍तरावर प्रयत्न वाढल्‍याचे जाणवणे

अ. तिचे भावाचे प्रयत्न वाढल्‍यामुळे तिला आता देवाचे साहाय्‍य मिळत आहे. त्‍यामुळे तिला प्रसंगानुरूप काव्‍यही सहज सुचते.

आ. कुठलाही उपक्रम घ्‍यायचा असेल, तेव्‍हाही ती ‘भावाच्‍या स्‍तरावर कसे प्रयत्न करायचे ?’ याविषयी दृष्‍टीकोन देते.’

३. सौ. कल्‍पना देशपांडे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) आणि श्री. महेश देशपांडे, संभाजीनगर

३ अ. प्रेमभाव

१. ‘मे मासाच्‍या पहिल्‍या सप्‍ताहात माझ्‍या (सौ. कल्‍पना देशपांडे यांच्‍या) मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. त्‍याच दरम्‍यान माझ्‍या नणंदेच्‍या पतीचे निधन झाले होते. त्‍या वेळी प्रियांकाताईने माझ्‍या मुलीच्‍या वाढदिवसासाठी तिला तिच्‍या आवडीचे उत्तप्‍पे करून दिले.

२. मार्च मासात आम्‍हा दोघांना (सौ. कल्‍पना आणि श्री. महेश देशपांडे यांना) आणि आमच्‍या लहान मुलीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्‍या वेळी प्रियांकाताई पुष्‍कळ व्‍यस्‍त होती. अनेक सेवा असतांनाही तिने कु. देवश्रीला (आमची मोठी मुलगी) ‘काय हवे-नको  ?’, ते सर्व बघितले. तिने तिला स्‍वयंपाक करून जेवायला घातले आणि तिची काळजी घेतली.

३ आ. कठीण प्रसंगात स्‍थिर रहाणे : एप्रिल मासात प्रियांकाताईच्‍या आजीचे (आईच्‍या आईचे) निधन झाले. त्‍या वेळी ती संभाजीनगर येथे होती. तिच्‍या घरी तिचे आई-वडील, लहान बहीण आणि भाऊ होते. कोरोनाच्‍या परिस्‍थितीत ‘पुणे येथे घरी जाऊन फार काही साध्‍य होणार नाही’, असा विचार करून तिने सेवेलाच प्राधान्‍य दिले. तिने तिच्‍या नातेवाइकांनाही परिस्‍थितीचे गांभीर्य लक्षात आणून देऊन एकत्र न येण्‍याविषयी सांगितले.

३ इ. सेवेची तळमळ : प.पू. गुरुदेवांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे ‘हिंदु राष्‍ट्र लवकर यावे’, अशी तिची पुष्‍कळ तळमळ आहे. कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांना विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून कृतीशील ठेवून त्‍यांना ‘देवाच्‍या अनुसंधानात कसे ठेवता येईल ?’, याकडे तिचे लक्ष असते.’

४. सौ. छाया देशपांडे (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) आणि कु. चैताली डुबे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), संभाजीनगर

प्रेमभाव : ‘दोन परिवारातील मिळून आम्‍ही एकूण ७ जण कोरोनाने बाधित झालो होतो. तेव्‍हा २ मास प्रियांकाताई अगदी प्रेमाने आम्‍हा सगळ्‍यांसाठी स्‍वयंपाक करत होती. प्रतिदिन ती प्रत्‍येकाच्‍या पथ्‍यानुसार वेगवेगळे डबे भरून वेळेच्‍या आधीच आम्‍हाला आणून द्यायची. हे सर्व करतांना तिचा तोंडवळा नेहमी आनंदी असायचा.’

५. कु. चैताली डुबे, संभाजीनगर

५ अ. तत्त्वनिष्‍ठता : ‘ती कार्यकर्त्‍यांना कधी भावनिक स्‍तरावर हाताळत नाही. ‘कार्यकर्त्‍यांना काय वाटेल ?’, असा प्रतिमेचा विचार न करता तत्त्वनिष्‍ठ राहून चुका सांगते.

५ आ. परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे : सेवाकेंद्रात आम्‍ही दोघीच होतो आणि मी रुग्‍णाईत असल्‍यामुळे सर्व सेवा तिला एकटीलाच कराव्‍या लागल्‍या. तेव्‍हाही तिने सर्व आनंदाने केले.

५ इ. भाव : एखाद्या सत्‍संगाची किंवा शिबिराची ‘पोस्‍ट’ करायची असल्‍यास ती त्‍यामध्‍ये कवितेच्‍या ओळी घालून भावाच्‍या स्‍तरावर ‘पोस्‍ट’ सिद्ध करते. तिची ‘पोस्‍ट’ वाचूनच सर्वांमध्‍ये भाव निर्माण होतो.

५ ई. कु. प्रियांकाताईमध्‍ये जाणवलेले पालट

१. पूर्वी ती अधिकारवाणीने बोलायची किंवा काही प्रसंग घडला, तर चिडायची; पण आता ‘आपल्‍या बोलण्‍यामुळे इतर दुखावले जाणार नाहीत’, असे तिचे प्रयत्न असतात. आता ती प्रेमाने, नम्रतेने आणि इतरांचा आदर करून बोलण्‍याचा प्रयत्न करते.

२. आता प्रियांकाताई पहाटे उठून नामजपादी उपाय अधिकाधिक पूर्ण करण्‍याचा प्रयत्न करते.

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.७.२०२१)