गोव्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना चालूच !

गोव्यात पावसामुळे हाहाःकार !

पणजी, २० जुलै (वार्ता.) – राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना चालूच आहेत. झाडे घरे, वाहने यांवर उन्मळून पडणे, घरे कोसळणे यांसारख्या विविध घटना चालू आहेत. पावसामुळे सत्तरी तालुक्यातील गुळेली येथील पुंडलिक बिसो नाईक यांचे मातीचे घर कोसळले आहे. त्यामुळे त्यांची अनुमाने ८० सहस्र रुपयांची हानी झाल्याचे समजते.

फोंडा येथील भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयाच्या छताचा काही भाग कोसळला असून अजूनही पडझड होण्याची भीती आहे. या कार्यालयाची इमारत जुनी आणि जीर्णावस्थेत आहे. यामुळे कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

सत्तरी तालुक्यातील केरीहून केळावडे-रावणला जाणार्‍या मार्गावर लागणार्‍या साटी आणि गटारो या ओढ्यांना पूर आल्याने त्यावरचे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत, तर वाळपई नगरपालिका क्षेत्रात आणि पर्ये-सत्तरी येथे घरांवर मध्यम आकाराची झाडे पडल्याने हानी झाली आहे.

साळावली धरण ओतप्रोत भरले

पाणी धरणाच्या भिंतीवरून वहात आहे

मडगाव – गोव्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यांतील अनेक धरणे भरली आहेत. दक्षिण गोव्यातील साळावली धरण ओतप्रोत भरले असून पाणी धरणाच्या भिंतीवरून वहात आहे.

२० जुलैला सकाळी ८ वाजता ही स्थिती होती. सहसा हे धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण भरते. गेल्या वर्षी (वर्ष २०२२मध्ये) हे धरण ८ जुलैला, तर वर्ष २०२१ मध्ये १४ जुलैला पूर्ण भरून वहात होते. अनेक वर्षांनंतर यंदा ते पूर्ण भरून वहाण्यास विलंब झाला आहे. परिसरात पाऊस व्यवस्थित पडल्यास नोव्हेंबर मासापर्यंत हे धरण पूर्ण भरलेल्या स्थितीत रहाते. या धरणाची जलाशय पातळी ४१.१५ मीटर आहे. यातून प्रतिसेकंद अधिकाधिक १ सहस्र ४५० घनमीटर पाणी सोडता येईल, अशी यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे.