‘८.६.२०२३ या दिवशी मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सेवेसाठी देहलीहून गोव्याला जाण्यासाठी विमानाने निघालो. हा विमानप्रवास २.१५ घंट्यांचा होता; म्हणून मी थोडा वेळ ‘महाशून्य’ हा नामजप केला. नंतर कानात ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवर भजने ऐकत बसलो. त्यामुळे विमानामध्ये दिलेल्या सूचना मला ऐकू येत नव्हत्या.
१. विमान गोव्याला पोचण्यापूर्वी साधारण २० मिनिटे आधी ‘सच्चिदानंद परब्रह्म प.पू. डॉक्टर’, असा नामजप चालू होऊन भावजागृती होणे
विमान गोवा विमानतळावर उतरण्याच्या २० मिनिटे आधी अकस्मात् माझा भाव जागृत होऊ लागला आणि माझ्याकडून ‘साच्चिदानंद परब्रह्म प.पू. डॉक्टर’ असा नामजप चालू होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर ‘त्यांच्यातील विष्णुतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे अनुभूती येत आहेत’, असे लक्षात येणे
त्यानंतर मला एक दृश्य दिसले, ‘मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी व्यासपिठावर उभा असून माझ्यासमोर सोनेरी मुकुट घातलेल्या देवता बसल्या आहेत.’ मला असे दृश्य पहिल्यांदाच दिसल्यामुळे माझा भाव जागृत झाला; पण ‘मला असे का दिसत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी कानातील ‘इअरफोन’ काढला, तेव्हा विमानात सूचना देत होते, ‘आता आपण १० मिनिटांत गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहोत.’ ती सूचना ऐकून देवाने माझ्या मनात विचार दिला, ‘ब्रह्मोत्सवानंतर गुरुदेवांमधील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील) विष्णुतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले असल्यामुळे माझ्यासारख्या क्षुद्र जिवालाही ते अनुभवता येत आहे.’
३. प्रथमच अनुभवलेली भावस्थिती !
या अनुभूतींमुळे मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन भावाश्रू येत होते आणि मनातून ‘कृतज्ञता परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), कृतज्ञता सद्गुरु पिंगळेकाका’, असा कृतज्ञतेचा धावा होत होता. मी विमानतळावरून घरी पोचेपर्यंत ४० – ५० मिनिटे भावस्थितीत होतो. माझा भाव जागृत होत होता आणि मनात ‘प.पू. डॉक्टर’, हा नामजप चालू होता.
४. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या बोलण्याची आलेली प्रचीती !
मी सद्गुरु पिंगळेकाकांना म्हणालो होतो, ‘‘सद्गुरु काका, माझ्यात भाव नाही. मला काहीच वाटत नाही. इतर साधकांना तुमच्याविषयी वाटते, तसे मला काही वाटत नाही. मी काय करू ?’’ तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘‘दादा, तुझ्यात भाव आहे; म्हणून तर तू इकडे आला आहेस. तू यावर अधिक विचार करू नकोस. तुझी साधना चालू ठेव. परम पूज्य आहेत ना.’’ आज मला त्यांच्या बोलण्याची प्रचीती आली !
५. कृतज्ञता
मी साधनेत आल्यापासून मला दृश्य स्वरूपात आलेली ही पहिलीच अनुभूती होती. मला ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ही अनुभूती टंकलेखन करतांनाही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळून माझा भाव जागृत होत होता. कृतज्ञता परम पूज्य, कृतज्ञता !’
– श्री. कार्तिक साळुंके, देहली सेवाकेंद्र (१.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |