साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मविश्वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्या भक्तीसत्संगरूपी ‘भक्तीगंगे’चे माहात्म्य जाणा आणि साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्तीसत्संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्वरी ज्ञान या माध्यमांतून अनुभवायला मिळालेली भक्तीसत्संगाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नवविधा भक्तीचे प्रत्यक्ष आचरण करून घेणारा ‘भक्तीसत्संग’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळे ‘भाववृद्धी सत्संग’ म्हणून चालू झालेली ही सत्संग शृंखला आता ‘भक्ती’ या टप्प्याला पोचली आहे. त्यामुळे त्याचे ‘भक्तीसत्संग’, असे नामकरण करण्यात आले आहे. सत्संग शृंखलेच्या नावाप्रमाणेच या सत्संग शृंखलेतील प्रत्येक सत्संग साधकांकडून नवविधा भक्तीचे (टीप) प्रत्यक्ष आचरण, म्हणजे प्रयत्न करून घेतो. त्यामुळे ‘साधकांना काळानुसार योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याकडून नवविधा भक्तीचे प्रायोगिक आचरण करून घेणारा सत्संग’, अशी भक्तीसत्संगाची आध्यात्मिकदृष्ट्या व्याख्या आहे. भक्तीसत्संगामुळे नवविधा भक्तीचे प्रायोगिक आचरण कसे होते ?’, ते पुढे दिले आहे.

टीप – नवविधा भक्ती : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१ अ. सत्संगात सांगितल्या जाणाऱ्या तात्त्विक भागामुळे साधकांकडून ‘श्रवण, कीर्तन आणि स्मरण’, हे नवविधाभक्तीचे प्रकार साध्य केले जाणे : सत्संगात सांगण्यात येणाऱ्या देवता, ऋषिमुनी आणि भक्त यांच्या कथांमुळे साधकांची श्रवणभक्ती (टीप २) होते. सत्संगातील भावजागृतीचे प्रयोग, नामजप आणि भावगीत यांमुळे साधकांची कीर्तनभक्ती होते. त्यामुळे त्यांना भावविश्व आणि आनंद अनुभवता येतो, तर सत्संगातील एकूण चैतन्यामुळे साधकांच्या स्मरणभक्तीत (टीप ३) वाढ होते.

टीप २ – भगवंताचे यश, गुण, माहात्म्य इत्यादी गोष्टी श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐकणे

टीप ३ – सतत भगवंताचे स्मरण करणे

१ आ. सत्संगात दिलेल्या ध्येयासाठी प्रयत्न करण्याच्या माध्यमातून साधकांकडून ‘पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य आणि सख्य’, हे नवविधाभक्तीचे प्रकार साधले जाणे

१ आ १. पादसेवन : देवता किंवा गुरु यांच्या चरणांचे पूजन किंवा स्मरण म्हणजे ‘पादसेवनभक्ती’ होय. प्रत्येक सत्संगात सर्व साधकांना भक्तीवृद्धीसाठी विशिष्ट ध्येय दिले जाते. या ध्येयाचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यासाठी शक्य तसे प्रयत्न आणि त्याग करण्याच्या माध्यमांतून साधकांना ‘पादसेवन’ हा भक्तीचा प्रकार साध्य करता येतो.

१ आ २. अर्चन : श्रद्धा आणि आदरयुक्त पूजा म्हणजे अर्चनभक्ती. आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या ‘शिवमानस पूजा स्तोत्रा’मध्ये त्यांनी ‘माझे देह हे मंदिर असून मी करत असलेली प्रत्येक कृती देवाची पूजा आहे’, असे सांगितले आहे. यातून दिवसभरातील प्रत्येक कृती ‘देवाची आराधना’ या भावाने करण्याची शिकवण त्यांनी समष्टीला दिली आहे. भक्तीसत्संगात सांगितलेले ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृती ठरवून त्यांना भावाची जोड देऊन प्रयत्न करण्याच्या माध्यमातून साधकांकडून काही प्रमाणात आद्य शंकराचार्य यांनी सांगितलेली ‘कर्मपूजा’ घडते. देवतेची पूजा करणे, म्हणजे अर्चनभक्ती होय. अशा प्रकारे साधकांची अर्चनभक्ती घडते.

१ आ ३. वंदन : भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्यांचे अंतरात ध्यान करत त्याची स्तुती करणे म्हणजे वंदनभक्ती. ज्या वेळी सत्संगात सांगितलेल्या ध्येयासाठी प्रयत्न केल्यावर देवाच्या कृपेने काही प्रमाणात किंवा काही प्रसंगांत साधकाला यश मिळते, त्या वेळी त्याच्या मनाला आनंद होतो आणि काही वेळाने ‘हे यश देवाच्या कृपेने मिळाले’, याची जाणीव होऊन त्याच्याकडून कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्या वेळी त्याने स्वतः अनुभवलेल्या भगवंताच्या महिम्याचे अंतरात ध्यान करत तो स्वतःच्या शब्दांत देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अशा प्रकारे भक्तीसत्संगामुळे साधकांची वंदनभक्ती घडते.

१ आ ४. दास्य : ‘भगवंतच माझा मायबाप, बंधू सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे’, असे अनुभवणे म्हणजे दास्यभक्ती. ज्या वेळी सत्संगात सांगितलेले प्रयत्न करतांना साधकात ‘माझी क्षमता नसतांना भगवंताने माझ्याकडून प्रयत्न करून घेतले’, अशी जाणीव निर्माण होते, त्या वेळी ‘भगवंतच कर्ता, करविता असून मी त्याचा लहान सेवक म्हणजे दास आहे’, असा संस्कार त्याच्या मनावर बिंबतो. अशा प्रकारे भक्तीसत्संगामुळे साधकांची दास्यभक्ती घडते.

१ आ ५. सख्य : भगवंत माझा मित्र, साथी, सखा आणि बंधू आहे, अशा प्रकारे भक्ती करणे म्हणजे सख्यभक्ती. ज्या वेळी सत्संगात सांगितलेले प्रयत्न करतांना ‘अनोळखी व्यक्ती किंवा साधक यांच्या माध्यमातून देवाचे साहाय्य मिळाले’, अशी अनुभूती साधक घेतो, त्या वेळी ‘देवालाच माझी काळजी असून देवच माझा मित्र, साथी, सखा असून तो वेगवेगळ्या रूपांत मला साहाय्य करत आहे’, याची सूक्ष्म जाणीव साधकाच्या अंतर्मनाला होते. अशा प्रकारे भक्तीसत्संगातून साधकांची सख्यभक्ती घडते.

१ इ. भक्तीसत्संगात साधकांनी आठवडाभरातील प्रयत्न सांगितल्यामुळे त्यांच्याकडून ‘आत्मनिवेदन भक्ती’ होणे : भक्तीची सर्वाेच्च पायरी म्हणजे आत्मनिवेदन. ‘भगवंताला सर्वस्वी शरण जाणे, आपला भार देवावर सोपवणे’, याला ‘आत्मनिवेदन’ म्हणतात. ज्या वेळी साधक त्यांनी केलेले आठवडाभरातील प्रयत्न भक्तीसत्संगात  मनमोकळेपणाने, म्हणजे त्या प्रसंगात आलेले मनातील विचार अन् चिंतन यांसह सांगतो, त्या वेळी त्याचे गुरु आणि भगवंत यांच्या चरणी आत्मनिवेदनच होत असते. तळमळीने आणि प्रामाणिकपणे आत्मनिवेदन करणाऱ्या साधकांवर ईशकृपा होते अन् गुरु त्यांना पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करतात.

अन्य प्रवचनकार, कीर्तनकार किंवा व्यष्टी साधना शिकवणारे संत, महात्मे किंवा विविध संस्था नवविधाभक्तींपैकी भक्तीच्या काही प्रकारांची शिकवण देतात; याउलट साधकांना प्रत्येक आठवड्याला नवविधा भक्ती करण्यासाठी नवीन ध्येय देऊन त्याची अनुभूती मिळवून देणारा हा आगळावेगळा भक्तीसत्संग ‘न भूतो न भविष्यती ।’, असा आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जाणार आहेत. ‘या कला आणि विद्या यांचे शिक्षण कशा प्रकारे असणार ?’, याचे प्रात्यक्षिक (डेमो) म्हणजे भक्तीसत्संग होय.

सूत्र १ मधील अधोरेखित लिखाणाचा संदर्भ : संकेतस्थळ – https://www.sanatan.org/mr/a/87628.html

२. तात्त्विक माहितीसह प्रायोगिक आणि काळानुसार व्यष्टी अन् समष्टी साधनेच्या योग्य प्रमाणामध्ये शिकवण देणारा सत्संग !

श्री. निषाद देशमुख

नवविधा भक्तीच्या प्रकारांमध्ये प्रार्थना आणि कृतज्ञता जोडली, तर भक्तीचे एकूण ११ प्रकार होतात. या ११ प्रकारांपैकी ‘श्रवण, कीर्तन आणि स्मरण’, हे तीन प्रकार तात्त्विक आणि मन अन् बुद्धी यांच्याशी निगडित आहेत, तर अन्य सर्व प्रकार प्रत्यक्ष कृती करून अनुभूती घेण्यासाठी आहेत. या सर्व प्रकारांना अंगीभूत केल्यामुळे भक्तीसत्संगात ‘श्रवण, कीर्तन आणि स्मरण’, या प्रकारांच्या माध्यमातून व्यष्टी साधनेसाठी पूरक अशी जवळजवळ ३० टक्के तात्त्विक माहिती दिली जाते, तर समष्टी साधनेला पूरक ७० टक्के प्रायोगिक भाग करून घेऊन साधकांना ‘पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन’, यांची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचे ध्येय दिले जाते. अशा प्रकारे साधकांना तात्त्विक आणि प्रायोगिक, अशा दोन्ही स्तरांवर कार्यरत करणारा अन् ३० टक्के एवढ्याच प्रमाणात व्यष्टी साधनेची शिकवण देणारा अन् ७० टक्के समष्टी साधना शिकवणारा हा संपूर्ण पृथ्वीवरील एकमेव सत्संग आहे.

३. समष्टी शिष्यत्वाची त्रिपुटी घडवणारा सत्संग !

‘शिकणे, प्रत्यक्ष कृती करणे आणि आध्यात्मिक अनुभूती घेणे’, ही समष्टी शिष्यत्वाची त्रिपुटी आहे. कोणत्याही सत्संगात येणाऱ्या जिवांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणे पुष्कळ कठीण असते. ‘त्यांच्याकडून योग्य साधना करून त्यांच्यात आध्यात्मिक अनुभूती ग्रहण करण्याची क्षमता जागृत करणे’, त्याहून अधिक कठीण असते.

याउलट भक्तीसत्संगात अधिकांश साधक आठवडाभरात केलेल्या ज्या प्रयत्नांच्या संदर्भात सांगतात, ते मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील नसून अनुभूतीच्या स्तरावरील असतात. यातून भक्तीसत्संगामुळे साधक ‘शिकणे, प्रत्यक्ष कृती करणे आणि आध्यात्मिक अनुभूती घेणे’, अशा प्रकारे शिष्यत्वाची त्रिपुटी साध्य करत आहेत’, हे लक्षात येते. हे भक्तीसत्संगाचे आगळेवेगळे आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य आहे.

४. भक्तीसत्संग नव्हे, तर ‘भक्तीयज्ञ’ !

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वेळोवेळी सप्तर्षी आणि अन्य दैवी शक्ती यांच्या मार्गदर्शनानुसार यज्ञ केले जातात. या यज्ञातून समष्टीत जेवढे चैतन्य प्रक्षेपित होते, तेवढेच चैतन्य प्रत्येक आठवड्यातील भक्तीसत्संगातून प्रक्षेपित होते. ‘भक्तीसत्संग हा ‘भक्तीयज्ञ’ आहे’, हे पुढील विश्लेषणातून स्पष्ट होईल.

भक्तीसत्संगात कथा सांगण्यापूर्वी सांगितले जाणारे मनोगत आणि साधकांना कथेशी एकरूप होण्यासाठी केले जाणारे आवाहन म्हणजे ‘यज्ञाचा संकल्प.’ ज्याप्रमाणे काळानुसार महर्षि विविध देवता, ऋषी आणि कधी-कधी यंत्र यांसाठी यज्ञ करायला सांगतात, त्याप्रमाणे प्रत्येक आठवड्याला देवता, ऋषिमुनी, संत अन् भक्त यांच्या समष्टीसाठी आवश्यक अशा गुणांचे प्रतिनिधित्व करणारी कथा सांगितली जाते. भक्तीसत्संगात सांगितलेली देवता, भक्त आणि महर्षि यांची भावपूर्ण कथा म्हणजे ‘यज्ञात देवतांची मांडणी करून करण्यात आलेली षोडशोपचार पूजा.’ साधकांनी ठेवलेल्या ध्येयानुसार केलेले प्रयत्नांचे आत्मनिवेदन म्हणजे यज्ञातील समिधा (तूप, फुले, वनस्पती इत्यादी घटक), भक्तीसत्संगात पुढच्या आठवड्यासाठी दिलेले ध्येय म्हणजे ‘यज्ञाची पूर्णाहुती’, तर भक्तीसत्संगातील शेवटचे भावगीत म्हणजे ‘यज्ञाची आरती’. वरील विश्लेषणातून स्पष्ट होते की, प्रत्येक आठवड्याला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग साधारण सत्संग नसून तो ‘भक्तीयज्ञ’ आहे आणि साधकांनी श्री गुरुचरणी अर्पण केलेले विविध प्रयत्न, म्हणजे यज्ञात अर्पित केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या समिधा होत.

५. भक्तीसत्संगात सूक्ष्मातून हनुमंत आणि श्रीकृष्ण यांनी सतत उपस्थित रहाणे, तर प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीसत्संगाच्या संदर्भात सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी निगडित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे भक्तीसत्संगाच्या आयोजनासाठी भक्तीशी संबंधित देवता आणि गुरु यांची शक्ती कार्यरत असते.

५ अ. भक्ती आणि शक्ती यांचे मूर्तीमंत रूप असलेला हनुमंत ! : हनुमंत स्वतः शिवाचा अंशावतार असूनही श्रीरामाची अनन्य भक्ती करून त्याने स्वतःमधील विष्णुतत्त्वात वाढ केली. असा हनुमंत नेहमीच धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी व्याकुळ आणि तत्पर असतो. असे म्हणतात की, ज्या ज्या ठिकाणी श्रीरामाची भावपूर्ण कथा सांगितली जाते, त्या त्या ठिकाणी हनुमंत सूक्ष्मातून, तर कधी कधी स्थुलातूनही येतो.

भक्तीसत्संगातून धर्मसंस्थापना करणारे, म्हणजे रामराज्य स्थापित करणारे समष्टी भक्त घडत असतात. त्यामुळे या सत्संगाचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सत्संग चालू होण्याच्या पूर्वी अर्धा घटिका ज्या ज्या ठिकाणी भक्तीसत्संगाचे प्रसारण होते, त्या त्या ठिकाणी हनुमंत सूक्ष्मातून उपस्थित असतो आणि सत्संग संपल्यानंतर अर्ध्या घटिकेने तेथून जातो. यातून भगवान हनुमंताची समष्टी कार्यातील दास्यभक्ती लक्षात येते. (अर्धा घटिका म्हणजे ६ मिनिटे आणि एक घटिका म्हणजे १२ मिनिटे.)

५ आ. भक्तीगुरु श्रीकृष्ण : भगवान श्रीकृष्ण भक्तीगुरु (भक्तीच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा गुरु) आहे. त्यामुळे तोही भक्तीसत्संगात नियमित उपस्थित असतो. श्रीकृष्ण वर्तमानकाळानुसार कार्य करत असल्यामुळे समष्टीला त्याच्या ज्या रूपाची आवश्यकता असते, त्या रूपात तो सूक्ष्मातून भक्तीसत्संगात कार्यरत असतो, उदा. कधी तो सर्वांना आनंद देणाऱ्या बाळकृष्णाच्या रूपात असतो, तर कधी गोपींचा अहं हरण करून त्यांना आनंद देणारा तरुण कृष्ण, कधी सुदामाचे विविध ताप हरणारा सखा राजा श्रीकृष्ण, तर कधी अर्जुनाला गीतेचे ज्ञान सांगून साधना करून घेणारा गुरुस्वरूप श्रीकृष्ण.

५ इ. भक्तीचे रहस्य जाणणारे प.पू. भक्तराज महाराज : ‘भक्तीचे रहस्य जाणतो, तो भक्तराज’, असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या नावाचा महिमा आहे. असे थोर संत आणि महान गुरु जे गुरुतत्त्वाशी एकरूप झाले आहेत, ते प.पू. भक्तराज महाराज विविध लीला करून, साधकांना विविध संकल्पना सुचवून आणि विचार देऊन भक्तीसत्संग घडवतात.’

(क्रमशः पुढील गुरुवारी)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक