‘हिंडनबर्ग अहवालाद्वारे आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – अदानी समूहाचा गंभीर आरोप

नवी देहली – अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी त्यांच्या विरोधातील ‘हिंडनबर्ग अहवाला’चे खंडण केले आहे. ते म्हणाले की, हा अहवाल भ्रामक आणि निराधार आरोपांवर आधारित आहे. हिंडनबर्ग आस्थापनाकडून आमची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक असे आरोप करण्यात आले. जानेवारी मासात अमेरिकी आस्थापन हिंडनबर्गने अदानी समूहाच्या विरोधात गंभीर आरोप करणारा अहवाल जारी केला होता. यात अदानी समूहावर आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे अदानी समूहाच्या समभागांचे मूल्य एकदम खाली आले होते. या सूत्रावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधातही अनेक आरोप केले होते.

या प्रकरणी अदानी यांनी पुढे म्हटले की, हिंडनबर्ग आस्थापनाने त्यांचा लाभ आणि स्वार्थ पाहूनच आमच्यावर आरोप केले. सामाजिक माध्यमे आणि विविध बातम्या यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात भ्रामक गोष्टी पसरवण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली. त्या समितीने जारी केलेल्या अहवालात आमच्या संदर्भात कोणताच अनुचित भाग नसल्याचे निष्पन्न झाले. यातून हे स्पष्ट होते की, हिंडनबर्गने चालवलेला प्रयत्न हा भारतीय बाजाराला अस्थिर करण्यासाठीचा कुटील डाव होता.