इराकमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ३०० वर्षे जुनी मशीद पाडली !

बगदाद (इराक) – इराकच्या बसरा शहरात एका महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ३०० वर्षे जुनी ‘अल् सिराजी’ मशीद आणि तिची मिनार पाडण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इराकच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कारवाईला विरोध दर्शवला असून ते याविरोधात न्यायालयात जाणार आहेत. मंत्रालयाने म्हटले की, सर्व प्रकारच्या विकासकामांना आमचा पाठिंबा आहे; परंतु याचा अर्थ हा नाही की, पुरातत्वीय महत्त्व असलेल्या धार्मिक इमारतींना नष्ट केले जावे. बसरा शहराचे राज्यपाल असद अल्-ईदानी यांनी मात्र दावा केला आहे की, मशीद आणि तिची मिनार (मशिदीच्या बाजूला असलेला मनोरा) पाडण्याच्या संदर्भात सुन्नी धार्मिक न्यासाला सूचित करण्यात आले होते.

१. या मशिदीचा मालकी अधिकार सुन्नी धार्मिक न्यासाकडे असून त्याचे म्हणणे आहे की,  स्थानिक प्रशासनाने मशिदीला पाडण्याविषयी आमच्याकडून अनुमती घेतली होती; परंतु मातीच्या विटांनी बनवलेल्या मिनारला पाडण्याचे ठरले नव्हते.

२. स्थानिक नागरिकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, ‘अशा ऐतिहासिक इमारती पाडणे, हा राष्ट्रीय वारसा जतन करण्याच्या दृष्टीने एक अपराध आहे. वर्ष २०१७ मध्ये इस्लामिक स्टेटकडून इराकच्या मोसुल शहरातील अल्-हदबा मिनारीला बाँबने उडवून दिल्यानंतर इराकच्या सांस्कृतिक वारशाची ही सर्वांत मोठी हानी आहे.

३. अल् सिराजी मशिदीची उभारणी वर्ष १७२७ मध्ये करण्यात आली होती आणि इराकमधील प्रमुख ऐतिहासिक स्थळांपैकी ती एक होती.

संपादकीय भूमिका 

केवळ इराकच नव्हे, तर इस्लामचा केंद्रबिंदू असणार्‍या सौदी अरेबियामध्येही विकासकामांच्या आड येणार्‍या मशिदी पाडल्या जातात. भारतात मात्र बेकायदेशीर मशिदी पाडण्याची प्रशासनाची सिद्धता नसते, हे संतापजनक !