६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती अनुराधा पेंडसे (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१. कौटुंबिक दायित्‍व असल्‍यामुळे साधनेला प्राधान्‍य न देणे

श्रीमती अनुराधा पेंडसे

‘माझा भाऊ आधुनिक वैद्य नरेंद्र दाते (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६४ वर्षे) सनातन संस्‍थेशी प्रथम जोडले गेले. ते नियमित सत्‍संगाला जात होते. नंतर वर्ष १९९४ मध्‍ये दाते कुटुंबीय सनातन संस्‍थेशी जोडले गेले. मला नामजप, सत्‍संग याविषयी आधुनिक वैद्य नरेंद्र दाते (भाऊ) आणि माझी आई, पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी नेहमी सांगत असत. पू. दातेआजींच्‍या घरी प.पू. गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) आले की, त्‍या मला बोलवायच्‍या. त्‍या वेळी गुरुदेवांना पाहिल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद होत असे आणि माझी भावजागृती होत असे. गुरुदेव, माझ्‍यावर पू. आजींचे संस्‍कार असल्‍यामुळे मला नामजप, सत्‍संग या गोष्‍टी पटत होत्‍या; पण त्‍या वेळी माझ्‍यावर कौटुंबिक दायित्‍व असल्‍यामुळे मी साधनेला प्राधान्‍य देत नव्‍हते. तेव्‍हा माझ्‍याकडून प्रत्‍यक्ष कृती होत नव्‍हती, तरी मी थोडाफार नामजप करत होते. मी स्‍तोत्रपठण, देवपूजा आणि धार्मिक ग्रंथवाचन करत होते.

२. यजमानांचे निधन झाल्‍यावर दोन मुलींचे दायित्‍व असूनही गुरुदेवांच्‍या कृपेमुळे सर्व दायित्‍वे सहजतेने पार पाडू शकणे

२७.११.२००० या दिवशी माझ्‍या यजमानांचे (आधुनिक वैद्य (डॉ.) अच्‍युत पेंडसे यांचे) अकस्‍मात् हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. तेव्‍हा आम्‍हा सर्वांनाच फार मोठा धक्‍का बसला होता. तेव्‍हा माझ्‍या एका मुलीचा (सौ. समिधा आशिष जोशी, वय ४९ वर्षे) विवाह झाला होता आणि दोन मुली (आताच्‍या सौ. प्रवदा प्रतोद पडळकर (वय ४७ वर्षे) आणि सौ. सिद्धी अजित रानडे (वय ४१ वर्षे)) शिक्षण घेत होत्‍या. गुरुदेव, अशा सर्व परिस्‍थितीतही मला तुमच्‍या कृपेमुळे स्‍थिर रहाता आले. ‘गुरुदेव, तुम्‍ही साधक आणि साधकांच्‍या कुटुंबियांची काळजी कशी घेता ?’, हे मला साधनेत आल्‍यावर लक्षात आले. तेव्‍हा मला व्‍यवहारातील काहीही येत नव्‍हते (उदा. बँकेचे (अधिकोषाचे) व्‍यवहार, आर्थिक गुंतवणूक करणे इत्‍यादी). ते मला तुमच्‍या कृपेमुळेच शिकता आले आणि नंतर ते व्‍यवहारही मला करता येऊ लागले. गुरुमाऊली, नंतर मुलींचे शिक्षण, विवाह ही सर्व दायित्‍वे तुमच्‍या कृपेमुळे मी सहजतेने पार पाडू शकले. ‘गुरुदेव, मागे घडलेल्‍या प्रसंगांतही तुम्‍ही माझ्‍या पाठीशी होतात’, याची जाणीव मला साधनेत आल्‍यावर तीव्रतेने झाली. मी प्रपंचातील सर्व दायित्‍वे पार पाडत होते. ‘मला एकटीलाच सर्व करायचे आहे’, या विचाराने मला काळजी वाटायची; पण तेव्‍हाही ‘तुम्‍हीच मला बळ देत होता’, असे आता माझ्‍या लक्षात आले आहे.

३. सत्‍संगाला जाऊ लागणेे

वर्ष २००२ मध्‍ये मी पुण्‍यातील विश्रांतवाडीतून कोथरूडला रहायला आले आणि तिथे सत्‍संगाला जाऊ लागले. मला सत्‍संगात गेल्‍यावर साधनेचे (नामजप, सत्‍संग, संतसेवा, त्‍याग, प्रीती) पुढचे पुढचे टप्‍पे समजू लागले. मी ज्‍यांच्‍याकडे सत्‍संगाला जात होते, त्‍यांना काही अडचण आली; म्‍हणून तो सत्‍संग नंतर माझ्‍या घरी होऊ लागला. तेव्‍हा मी सत्‍संगाची आतुरतेने वाट पहात असे.

४. सेवेचे दायित्‍व घेता येणे

मला प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे सेवाही मिळू लागल्‍या. त्‍या वेळी साधकांनी मला ‘सेवेची व्‍याप्‍ती कशी काढायची ? कार्यपद्धत कशी आहे ?’, हे सर्व शिकवले. सेवा करतांना माझ्‍याकडून काही चुका झाल्‍या, तर मला त्‍यातूनही शिकायला मिळत होते. त्‍या वेळी माझ्‍याकडे कोथरूड केंद्राचे वह्या आणि पंचाग यांच्‍या वितरणाचे दायित्‍व होते.

५. गुरुदेवांनी स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवणे

गुरुदेव, तुम्‍ही मला स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवलीत. अशी प्रक्रिया इतर कुठेच पहायला मिळत नाही. या प्रक्रियेमुळे स्‍वतःचे स्‍वभावदोष लक्षात येऊन ‘स्‍वतःमध्‍ये कसा पालट करायचा ?’ हे मला समजले. गुरुमाऊली, आपण मला सर्वकाही भरभरून देत आहात आणि शिकवत आहात; पण मीच प्रयत्न करण्‍यास अल्‍प पडत आहे. माझी तळमळ, सातत्‍य आणि चिकाटी अल्‍प पडते.

६. गुरुदेवांनी कठीण प्रसंगात स्‍थिर आणि शांत रहाण्‍याचे बळ देणे

आजपर्यंत माझ्‍यावर जे जे कठीण प्रसंग आले, ते सहन करण्‍याची शक्‍ती आपणच मला दिलीत. मला आलेल्‍या समस्‍या आपल्‍याच कृपेने सहजपणे सुटत गेल्‍या. वर्ष २०१६ मध्‍ये मला मोठा अपघात झाला. मी दुचाकी चालवत होते, तेव्‍हा माझी गाडी वाळूवरून घसरली आणि माझ्‍या डाव्‍या पायावर पडली. त्‍यामुळे माझ्‍या गुडघ्‍याचे हाड मोडले. त्‍या परिस्‍थितीत वेदना सहन करण्‍याची शक्‍ती आपणच मला दिलीत. माझ्‍या पायांची शस्‍त्रक्रिया करतांना आधुनिक वैद्यांनी माझ्‍या गुडघ्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला प्‍लेट्‌स (चकत्‍या) आणि स्‍क्रू बसवले होते. तेव्‍हाही आपणच मला स्‍थिर आणि शांत रहाण्‍याचे बळ दिलेत.

७. माझ्‍यावर शस्‍त्रक्रिया चालू असतांना मला संपूर्ण निळा प्रकाश दिसत होता. शस्‍त्रक्रिया होत असतांना माझा नामजप चालू होता. तेव्‍हा मी देवाच्‍या अनुसंधानात होते.

८. प.पू. पांडे महाराज यांनी गुरुदेवांचे स्‍मरण करण्‍यास सांगितल्‍यावर त्‍यातील चैतन्‍याची जाणीव होणे

शस्‍त्रक्रियेनंतर मी चाकांची आसंदी (व्‍हिल चेअर) वापरायचे. मी साधारण ८ मास ‘वॉकर’ आणि काठी यांच्‍या साहाय्‍याने चालत होते. तेव्‍हा मी प.पू. पांडे महाराज यांनी दिलेले उपाय आणि नामजप करत होते. प.पू. पांडे महाराज यांनी मला प्रतिदिन किमान १०० वेळा तरी ‘गुरुदेवांचे स्‍मरण कर’, असे सांगितले होते. मी गुरुदेवांचे स्‍मरण करत असतांना ‘चैतन्‍य मिळत आहे आणि मला बरे वाटत आहे’, असे मला जाणवायचेे.

९. गुरुकृपेमुळे फेब्रुवारी २०२२ मध्‍ये देवद आश्रमात रहाण्‍याची संधी मिळणे आणि आश्रमजीवन आवडू लागणे

आपल्‍या कृपेमुळे फेब्रुवारी २०२२ मध्‍ये मला देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात राहून सेवा करण्‍याची संधी मिळाली. आश्रमात आल्‍यावर माझ्‍यातील मनमोकळेपणा वाढला. आश्रमातील साधक एकमेकांना साहाय्‍य करतात, सर्वांची काळजी घेतात. त्‍यामुळे मला आश्रमजीवन आवडू लागले. मी आश्रमात साधना आणि सेवा करत होते. तेव्‍हा तेथील वातावरण आणि चैतन्‍य अनुभवतांना मला आनंद मिळत होता. मला तेथे विविध सेवा शिकायला मिळाल्‍या. माझ्‍याकडून प्रत्‍येक कृती, प्रार्थना आणि कृतज्ञता भाव ठेवून केली जायची. त्‍यामुळे मला त्‍यातील आनंद मिळत होता.

‘हे गुरुमाऊली, तुम्‍हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना मला करता येऊ दे. तुम्‍ही मला सतत भक्‍तीभावाच्‍या स्‍थितीत ठेवा’, अशी मी तुमच्‍या चरणी प्रार्थना करते, तसेच हे सर्व तुम्‍हीच माझ्‍याकडून लिहून घेतलेत, तरी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती अनुराधा पेंडसे (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक