स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्‍यावर स्‍वतःमध्‍ये सकारात्‍मक पालट झाल्‍याचे अनुभवणारे श्री. दीप पाटणे (वय २२ वर्षे) !

श्री. दीप पाटणे

१. उत्तरदायी साधकाने सेवेचे नियोजन करून दिल्‍यावर त्‍यानुसार कृती करणे आणि त्‍यानंतर सर्व कृती वेळच्‍या वेळी अन् स्‍वतः करण्‍याची सवय लागणे 

‘पूर्वी माझ्‍यामध्‍ये नियोजन आणि स्‍वयंशिस्‍त यांचा पुष्‍कळ अभाव होता. त्‍यामुळे माझा पुष्‍कळ वेळ वाया जायचा. मी स्‍वयंपाकघरात सेवा करायला लागल्‍यावर तेथील दायित्‍व असणार्‍या साधकाने मला माझ्‍या सेवेचे नियोजन करून दिले. त्‍यानुसार कृती केल्‍यावर मला ‘सकाळी उठणे, महाप्रसाद ग्रहण करणे, नामजपादी उपाय करणे, सेवा, कपडे धुणे, रात्री झोपणे’, हे सर्व वेळच्‍या वेळी करता येऊ लागले आणि स्‍वतःच्‍या कृती स्‍वतः करण्‍याची सवय लागली.

२. सहसाधकांमुळे ‘व्‍यवस्‍थितपणा’ हा गुण अंगी येण्‍यास साहाय्‍य होणे 

माझ्‍यामध्‍ये पुष्‍कळ अव्‍यवस्‍थितपणा होता. देवाने मला व्‍यवस्‍थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण असलेल्‍या साधकांसह ठेवले. त्‍यांच्‍या समवेत राहिल्‍याने माझ्‍यातील ‘अव्‍यवस्‍थितपणा’ हा स्‍वभावदोष न्‍यून होण्‍यास साहाय्‍य झाले. ‘व्‍यवस्‍थित आणि नीटनेटके राहिल्‍याने काय लाभ होतो ?’, हे माझ्‍या लक्षात आले आणि त्‍याप्रमाणे माझ्‍याकडून कृती होऊ लागल्‍या.

३. आश्रमातील चैतन्‍यामुळे बाहेरील चविष्‍ट पदार्थ खाण्‍याच्‍या संदर्भातील मनातील विचार न्‍यून होणे 

मला बाजारातील चविष्‍ट पदार्थ खाण्‍याची सवय होती. मी आश्रमात आल्‍यावर माझ्‍या मनात प्रतिदिन बाहेरील पदार्थ खाण्‍याच्‍या संदर्भात विचार यायचे. देवाच्‍या कृपेने आश्रमातील चैतन्‍यामुळे ८ – ९ मासांत खाण्‍याच्‍या संदर्भातील माझ्‍या मनातील विचारांची तीव्रता उणावली. आता माझ्‍या मनात क्‍वचित्‌च बाहेरील पदार्थ खाण्‍याच्‍या संदर्भात विचार येतात.

४. ‘प्रतिमा जपणे’ आणि ‘न्‍यूनगंड असणे’, हे पैलू न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करणे, ते न्‍यून झाल्‍यावर साधकांशी सहजतेने बोलता येऊ लागणे आणि त्‍यातून आनंद मिळू लागणे 

माझ्‍यातील ‘प्रतिमा जपणे’, या अहंच्‍या पैलूमुळे मला आश्रमात सेवा करतांना पुष्‍कळ अडथळे येत होते. त्‍यामुळे छोट्या प्रसंगातही माझ्‍या मनाचा संघर्ष होत असे. मी व्‍यष्‍टी साधनेचा आढावा आणि भाववृद्धी सत्‍संग यांमध्‍ये प्रतिमा जपण्‍याचे प्रसंग सांगून त्‍यांवर दृष्‍टीकोन घेतले अन् कृतीच्‍या स्‍तरावर प्रयत्न केले. त्‍यामुळे माझ्‍यातील ‘प्रतिमा जपणे’, हा अहंचा पैलू ५० ते ६० टक्‍के उणावला. ‘प्रतिमा जपणे’, हा अहंचा पैलू जसजसा न्‍यून होत गेला, तसे मला साधकांशी सहजतेने बोलता येऊ लागले. मला सर्वांशी बोलून आनंद मिळू लागला आणि शिकायलाही मिळाले.

आश्रमातील उन्‍नत, ज्‍येष्‍ठ आणि दायित्‍व असलेले साधक यांच्‍याशी बोलतांना माझा पुष्‍कळ संघर्ष व्‍हायचा. त्‍यामागे माझा ‘न्‍यूनगंड असणे’, हा अहंचा पैलू होता. मी व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यात असे सर्व प्रसंग सांगून दृष्‍टीकोन घेतले आणि आढावासेवकांनी सांगितल्‍यानुसार हळूहळू अनौपचारिक बोलणे चालू केले. काही साधकांशी बोलण्‍यापूर्वी मला वारंवार सराव करावा लागत होता. स्‍वयंसूचना सत्र आणि प्रत्‍यक्ष कृती यांद्वारे मला साधकांशी सहजतेने बोलता येऊ लागले.

५. आढावासेवकांकडून मार्गदर्शन घेऊन कृतीच्‍या स्‍तरावर कठोरतेने प्रयत्न केल्‍याने ‘अपेक्षा करणे’, या अहंच्‍या पैलूवर मात करता येणे

पूर्वी एखाद्या व्‍यक्‍तीशी चांगली जवळीक झाली की, माझ्‍या त्‍याच्‍याकडून अपेक्षा असायच्‍या आणि मी त्‍या व्‍यक्‍तीमध्‍ये अडकायचो. अपेक्षांमुळे अनेक प्रसंगांमध्‍ये मला मानसिक त्रासही व्‍हायचा. मी असे प्रसंग आढाव्‍यात मांडून आढावासेवकांकडून मार्गदर्शन घेतले आणि कृतीच्‍या स्‍तरावर कठोरतेने प्रयत्न केले. त्‍यामुळे माझ्‍यातील ‘अपेक्षा करणे’ आणि ‘व्‍यक्‍तीत अडकणे’, हे स्‍वभावदोष न्‍यून झाले अन् इतरांना समजून घेतल्‍यामुळे मी आनंदी राहू लागलो.

६. आनंद आणि सुख यांतील भेद स्‍पष्‍ट होऊन आनंदी रहाण्‍याचा प्रयत्न करणे

मी स्‍वयंपाकघरात शारीरिक सेवा केल्‍यावर थकत असे, तरीही माझ्‍या मनाला आनंद मिळत असे. बाहेर सर्व आवडीच्‍या गोष्‍टी, उदा. खाणे, पिणे, बाहेर फिरणे, असे केल्‍यावर मला चांगले वाटत असे, म्‍हणजे सुख मिळत असे. आता मला आनंद आणि सुख यांतील भेद स्‍पष्‍ट झाला अन् माझी आनंदी रहाण्‍यासाठी धडपड वाढू लागली.

७. अंतर्मुखता निर्माण होणे 

मी बाहेर शिकत असतांना मित्रांमध्‍ये मस्‍करी करण्‍याचा भाग अधिक असल्‍याने माझ्‍यामध्‍ये पुष्‍कळ बहिर्मुखता होती. आश्रमात आल्‍यापासून साधनेचा आढावा दिल्‍यावर आणि भाववृद्धी सत्‍संग ऐकल्‍यावर माझ्‍यामध्‍ये अंतर्मुखता निर्माण झाली.

८. मनाचा अभ्‍यास करण्‍याची सवय लागणे

स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेमुळे मला मनाचा अभ्‍यास करण्‍याची सवय लागली. त्‍यामुळे ‘माझ्‍या मनाच्‍या स्‍थितीत पालट होत गेला’, याची अनुभूती मी घेऊ शकलो.

९. पू. रेखा काणकोणकर यांच्‍या सहवासामुळे प्रेमभावात वाढ होणे

पूर्वी माझी वृत्ती आत्‍मकेंद्रित होती. गुरुदेवांच्‍या कृपेने मला पू. रेखाताईंचा (सनातनच्‍या ६० व्‍या संत पू. रेखा काणकोणकर यांचा) सहवास लाभला. ‘संत इतरांवर प्रीती करतात. ते सतत इतरांचाच विचार करतात’, हे पाहून मीसुद्धा त्‍यांच्‍याप्रमाणे कृती करू लागलो. मी तसे प्रयत्न केल्‍यावर मला पुष्‍कळ आनंद मिळाला.

१०. गुरुदेव सर्वशक्‍तीमान असल्‍याची प्रचीती आल्‍यावर त्‍यांच्‍यावरील श्रद्धा वाढणे 

गुरुदेवांनी प्रक्रियेच्‍या कालावधीत असे काही प्रसंग घडवले की, ज्‍यातून ‘गुरुदेव सर्वशक्‍तीमान आहेत’, याची मला प्रचीती आली. माझी त्‍यांच्‍यावरील श्रद्धा वाढत गेली. ‘कठीण प्रसंगांतही माझ्‍या समवेत गुरुदेव आहेत’, हा विचार माझ्‍या मनाला स्‍थिरता देतो.

११. ‘गुरुदेवांविना आपले कुणीच नाही’, हा भाव वाढत जाणे आणि ‘मागील अनेक जन्‍मांपासून गुरुदेव आपल्‍याला सांभाळत आहेत’, याची जाणीव होणे 

आश्रमात भाववृद्धी सत्‍संग ऐकल्‍यावर आणि स्‍वभावदोष अन् अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया समजून घेतल्‍यावर माझ्‍या मनात हळूहळू गुरुदेवांप्रतीचा भाव वाढत गेला. अनेक प्रसंग घडत गेले आणि माझ्‍या मनातील ‘गुरुदेवांविना आपले कुणीच नाही’, हा भाव वाढत गेला. मला नामजपाचा आधार वाटू लागला. गुरुदेवांची आठवण येऊन माझी भावजागृती व्‍हायची. त्‍या वेळी मला वाटायचे, मला गुरुदेवांप्रती एवढी आत्‍मीयता, प्रेम आणि त्‍यांचा आधार का वाटतो ? आमचे नाते या एका जन्‍माचे नक्‍कीच नसावे. मागील अनेक जन्‍मांपासून गुरुदेव मला सांभाळत आहेत.

‘गुरुदेवांच्‍या कृपेने मला आश्रमात राहून साधना करायला मिळत आहे. त्‍यांनी माझ्‍यामध्‍ये पालट घडवून आणला आणि मला आनंदी जीवन जगण्‍यास शिकवले. त्‍यांनी मला ‘ईश्‍वरप्राप्‍ती’ या ध्‍येयाच्‍या मार्गावर अगदी सहजतेने आणून ठेवले’, याबद्दल मी गुरुदेवांच्‍या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. दीप संतोष पाटणे (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२३)