राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने भरपावसात उघड्यावर अंत्यविधी !

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांसह राज्यातील १० जिल्ह्यांत २ सहस्र ८५२ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. ज्यांचे निधन झाले त्यांच्या स्वत:च्या शेतात, कुठे नदीकाठी, तर काही ग्रामस्थांना शेजारच्या गावातील स्मशानामध्ये अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. सध्या पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करतांना ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. अंत्यविधीसाठी जागेची अडचण, घराजवळ स्मशानभूमी नको; म्हणून ग्रामस्थांचा विरोध, निधीची अडचण अशा समस्यांमुळे स्मशानभूमीची कामे रखडली आहेत. मृत्यूनंतरही व्यक्तीच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत, असे ग्रामस्थ अनुभवत आहेत. (१० जिल्ह्यांत स्मशानभूमी नसणे, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! जनतेच्या प्राथमिक समस्यांची संवेदनशीलता नसणारे प्रशासन काय कामाचे ? अशा प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक)


नगर येथे उघड्यावर होतात अंत्यविधी !

नगर जिल्ह्यातील पाथर्डी ३२, नेवासे २६, अकोले २४, पारनेर १६, श्रीगोंदे १६, नगर तालुक्यातील १४ अशा एकूण १५० गावांत स्मशानभूमी नाही. कुठे उघड्यावर, तर कुठे शेतात, गायरान जागेवर अंत्यविधी करावे लागत आहेत.


नाशिक येथे ४६१ गावांमध्ये स्मशानभूमी नाही !

नाशिक जिल्ह्यातील ४६१ गावांत स्मशानभूमी नाही. निधीअभावी स्मशानभूमीचे काम झालेले नाही. सुरगाणा तालुक्यात १४० गावे आणि पाडे यांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्तेही नसल्याने हाल होतात.


जळगाव येथे निधी संमत; मात्र बांधकाम नाही !

जळगाव जिल्ह्यातील १४८ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. नदीकाठी आणि शेत यांमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. नियोजन समितीने स्मशानभूमी बांधकामासाठी १४.८० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे; मात्र बांधकामे झालेली नाहीत.


सोलापूर जिल्ह्यातील गावांत वादाने रखडले स्मशानभूमीचे काम !

सोलापूर जिल्ह्यातील ९० गावांमध्ये स्मशानभूमी आणि दहन शेड नाही. ६९ गावांमध्ये स्मशानभूमीसंदर्भात तक्रारी आहेत. माळशिरसला लिंगायत समाजाची स्मशानभूमी नाही. अंत्यविधीसाठी अकलूज येथे जावे लागते.


बीड जिल्ह्यातील ६५६ गावांत नाही स्मशानभूमी !

बीड जिल्ह्यातील १ सहस्र ३९४ पैकी ६५६ गावांत स्मशानभूमीची सुविधाच नाही. काही गावांतील स्मशानभूमीची दैना झाली आहे. काही गावांत शेतात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. पावसाळ्यात मृतदेहांची हेळसांड होत आहे.


नंदुरबार येथे नदी पार करून करावे लागतात अंत्यविधी !

नंदुरबार जिल्ह्यातील २९५ गावांत स्मशानभूमी नाही. धनराट कोतवाल फळी येथे रंगावली नदी पार करून मृतदेह खांद्यावरून घेऊन जावा लागतो. नदीत दोर बांधून नदी पार करावी लागत आहे. वनभूमी आणि लांब असलेले पाडे या अडचणी आहेत.


धुळे जिल्ह्यात शेतात आणि नदीकाठी होतात अंत्यविधी !

धुळे जिल्ह्यात १४३ गावांत स्मशानभूमी नाही. काही गावांत नदीकाठी, तर आदिवासी भागांत स्वतःच्या शेतात, भाऊबंदकीच्या शेतात अंत्यसंस्कार केले जातात. जनसुविधांमधून निधी उपलब्ध न झाल्याने, तसेच जागा उपलब्ध होत नसल्याने अमरधाम नाहीत.


हिंगोली येथे स्वत:च्या शेतात अंत्यविधी !

हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती असून त्यांपैकी ८५ ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी नाही. ग्रामस्थांना स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करावे लागतात. ग्रामपंचायतींच्या मालकीची जागा नसल्याने स्मशानभूमी उभारणीला अडचणी येत आहेत. जिल्ह्यात लोकसहभागातून स्मशानभूमी उभारण्यात आलेली नाही.


जालना जिल्ह्यातील गावांत उघड्यावरच अंत्यसंस्कार !

जालना जिल्ह्यात ९७१ ग्रामपंचायती आहेत, यांपैकी ६९५ गावांमध्ये स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर २७० गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी आणि दफनभूमी नाही. उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात.