गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

द्वारकाधीश मंदिर

द्वारका (गुजरात) – महराष्ट्रासह देशांतील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर आता येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरातही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिराच्या विश्‍वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार जगत मंदिर द्वारकेची प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करावे लागतात. वस्त्रसंहितेविषयी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये लिहिलेले फलक मंदिराबाहेर लावण्यात आले आहेत.

१. मंदिराच्या बाहेरील फलकावर लिहिले आहे की, मंदिर हे दर्शनाचे ठिकाण आहे, स्वतःच्या प्रदर्शनासाठीचे नाही. मंदिरात येणार्‍या सर्व भाविकांनी साधे कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा. तोकडे कपडे, हाफ पँट, बर्मुडा, मिनी टॉप, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रॉक आणि फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

वस्त्रसंहितेविषयी लिहिलेला फलक

२. मंदिराचे विश्‍वस्त पार्थ तलसानिया यांनी सांगितले की, मंदिरात येणार्‍या अनेक भाविकांच्या तक्रारीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. असे कपडे परिधान केल्याने इतर भाविकांचे लक्ष विचलित होत असल्यानेे देशातील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

राधा राणी मंदिर

नुकतेच मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यासह उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यांतील अनेक मंदिरांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला आहे.