कोकण रेल्वेमार्गावर  ११ आणि १२ जुलैला ‘मेगाब्लॉक’

रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर देखभालीच्या कामासाठी ११ जुलै या दिवशी  जिल्ह्यातील संगमेश्वर ते भोके दरम्यान आणि १२ जुलै या दिवशी कुडाळ (सिंधुदुर्ग) ते वेर्णा (गोवा) दरम्यान ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याचा परिणाम एकूण ६ गाड्यांवर होणार आहे,  ११ जुलैला संगमेश्वर ते भोके दरम्यान सकाळी ७.३० ते १०.३० अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे तिरुनेलवेली-जामनगर ही एक्सप्रेस कर्नाटकातील ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान २ घंटे ३० मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे. तर थिरूवनंतपूरम्  सेंट्रल-लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान १ घंटा थांबवून ठेवण्यात येणार आहे.

१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

यामुळे मुंबई सी.एस्.एम्.टी-मडगाव ही जनशताब्दी एक्सप्रेस गोव्यातील थिवी स्थानकावर ३ घंटे, हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम् ही मंगला एक्सप्रेस रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच घंटे रोखून ठेवली जाणार आहे. याचसमवेत दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ही प्रतिदिनची गाडी रोहा ते कणकवली दरम्यान ५० मिनिटे, तर थिरूवनंतपूरम् सेंट्रल-हजरत निजामुद्दीन ही गाडी ठोकूर ते वेर्णा दरम्यान २ घंटे ५० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.