बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मजुरांच्या मुलींच्या विवाह अनुदान योजनेत लक्षावधी रुपयांचा घोटाळा !

  • समाजाच्या ढासळलेल्या नैतिकतेचे उदाहरण !

  • ५५५ दांपत्यांपैकी २०० लोक बनावट !

  • प्रत्येक दांपत्याला ७५ सहस्र रुपयांचे देण्यात आले सरकारी अनुदान !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्य सरकारने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह समारंभांत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बातमी समोर आली आहे. बुलंदशहर येथील श्रम विभागातील मजुरांच्या मुलींच्या विवाह अनुदान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक विवाहासाठी अनुदान स्वरूपात ७५ सहस्र रुपये दिले गेले. एकूण ५५५ दांपत्यांचा विवाह लावण्यात आला. यांपैकी किमान २०० लोक असे आहेत, जे पूर्णत: अपात्र आहेत.

१. अनेक प्रकरणांत असे लक्षात आले की, विवाहासाठी नोंदणी केलेल्या वरांची माहिती खोटी असून अमुक गावात त्या नावाची कुणी व्यक्तीच रहात नाही, तरीही याची निश्‍चिती न करता नोंदणी करणार्‍यांच्या बँक खात्यांमध्ये ७५ सहस्र रुपये जमा करण्यात आले. तसेच काही प्रकरणी लोकांनी स्वत:च्या नात्यातच विवाह लावल्याची नोंदणी करून सरकारी अनुदान लाटले.

२. अशा प्रकारे बनावट वर सिद्ध करून जवळपास १२ लाख रुपये लाटले गेले. यामध्ये आतापर्यंत एकूण १६ दांपत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काही प्रकरणांत तर काही वर हे विवाहित असल्याचेही समोर आले आहे.

संपादकीय भूमिका 

सरकारी अनुदान देतांना संबंधित लाभार्थीची पात्रता पडताळूनच ते दिले गेले पाहिजे. हा साधा नियमही न पाळणार्‍या संबंधित भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली पाहिजे !