साधनेत प्रगती होण्‍यासाठी ‘शरणागतभावा’ला अनन्‍यसाधारण महत्त्व असून ‘शरणागती’ निर्माण होण्‍याचे सर्वोच्‍च श्रद्धास्‍थान म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘शरणागतभाव’ हा विषय साधनेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाचा आहे. म्‍हटले, तर अतिशय अवघड आणि कृतीच्‍या स्‍तरावर अतिशय सोपा ! मी याविषयी जे वाचले, ऐकले आणि अनुभवले, ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन अर्पण करतो. ‘मला काय अशक्‍य आहे ? लाथ मारीन, तेथे पाणी काढीन’, अशा मानसिकतेत मी अडकलो होतो. व्‍यवहारिक अनुभवांवरून ‘कर्तेपणा’, ‘स्‍वतःला श्रेष्‍ठ समजणे’, ‘मला सर्व येते’ या अहंच्‍या पैलूंमुळे पुष्‍कळ अहं निर्माण झाला होता.

वर्ष १९८९ मध्‍ये परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आल्‍यावर याची जाणीव झाली. त्‍यांच्‍या कृपेने अध्‍यात्‍मात आल्‍यावर शरणागतीची महती समजली. ‘माझ्‍यापेक्षा श्रेष्‍ठ अगणित लोक असून ईश्‍वर आणि श्री गुरु हे सर्वश्रेष्‍ठ असून त्‍यांना शरण गेल्‍याविना परमार्थ करता येत नाही’, हे ३४ वर्षांच्‍या साधनाप्रवासात शिकायला मिळाले.


‘शरणागतभाव’ येण्‍यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१. साधकाला शरण जाण्‍यासाठी वय किंवा परिस्‍थिती याचे बंधन नसते.

२. ज्ञान, धर्म, कर्म किंवा साधन हे सर्व अल्‍प असले, तरी चालेल; पण श्रद्धा असली की, भगवंत शरणागतीचे दार उघडतो.

३. जो साधक ‘मी आणि माझे’, ही भावना त्‍यागतो, त्‍याला शरणागतीची पहिली पायरी प्राप्‍त होते.

४. साधक जेवढा अंतर्मुख, तेवढा तो शरणागतीस लवकर पात्र होतो.

५. साधकाचा ‘अहंकार’ जितक्‍या वेळा हरतो, तितक्‍या वेळा तो गुरुचरणांच्‍या अधिकाधिक जवळ जातो. ईश्‍वरास अहंकाराचे दान करून शरणागती पत्‍करली की, ईश्‍वराचे विराटपण अनुभवास येते.

६. शरणागत साधकातील स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाचे दायित्‍व भगवंत (गुरु) स्‍वीकारतो. ‘शरणागती’ ही चित्त शुद्ध आणि विशाल करणारी कृती आहे.

७. शरणागत साधकास जगण्‍याचा कंटाळा येत नाही किंवा मरणाची भीतीही वाटत नाही.

८. शरणागती म्‍हणजे आपला जीव भगवंतात किंवा गुरुचरणांत विरघळवणे.


१. अध्‍यात्‍मात आल्‍यावर समजलेले ‘शरणागती’चे महत्त्व

पू. शिवाजी वटकर

१ अ. साधनेत प्रगतीसाठी ‘शरणागती’ हे महत्त्वाचे साधन ! : शालेय जीवनात मला ‘शरण येणे’ किंवा ‘शरणागती’ हे शब्‍द प्रथम ऐकायला मिळाले. अध्‍यात्‍मात ‘आपला जन्‍म प्रारब्‍धभोग संपवून, साधना करून मोक्षप्राप्‍तीसाठी आहे’, हे शिकायला मिळाले. साधनेत प्रगतीसाठी ‘शरणागती’ हे महत्त्वाचे साधन आहे. ईश्‍वराला, गुरूंना किंवा साधना होण्‍यासाठी कुणालातरी शरण जायचे असते. शरणागतभावातील साधक अहंवर मात करून गुरुकृपेने आध्‍यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो.

१ आ. संतांनी शरणागतीचे महत्त्व सांगून साधकांना उन्‍नतीचा मार्ग दाखवणे : श्री ज्ञानेश्‍वरमाऊली, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्‍वामी, गुरु नानक, प.पू. भक्‍तराज महाराज या थोर संतांनी स्‍वानुभवातून ‘शरणागतीचे अनन्‍यसाधारण महत्त्व आणि ते कसे साध्‍य करायचे ?’, याविषयी सांगितले आहे.

१ इ. श्रीकृष्‍णाने अर्जुनाला ‘शरण’ येण्‍याचा उपदेश करणे : श्रीकृष्‍णाने भगवद़्‍गीतेतून अर्जूनाला ज्ञान, भक्‍ती, वैराग्‍यादी शिकवले. हा खटाटोप करण्‍याऐवजी शेवटचा रामबाण उपाय म्‍हणून श्रीकृष्‍णाने अर्जुनाला ‘शरण’ येण्‍यास सांगितले.

सर्वधर्मान्‍परित्‍यज्‍य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्‍वा सर्वपापेभ्‍यो मोक्षयिष्‍यामि मा शुच: ॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय १८, श्‍लोक ६६

अर्थ : सर्व धर्म, म्‍हणजे सर्व कर्तव्‍यकर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्‍तीमान, सर्वाधार अशा मला परमेश्‍वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस.

२. ‘शरण’ या शब्‍दाची उत्‍पत्ती

‘शरण’ हा शब्‍द ‘शॄ’ या धातूपासून उत्‍पन्‍न झाला आहे.

‘शृणाति दुःखमनेनेति ।’ (शब्‍दकल्‍पद्रुम), म्‍हणजे ‘ज्‍यानेे दुःखाचा नाश केला जातो, ते शरण !’

३. शरणागतीची व्‍याख्‍या

‘मी’ ही भावना प्रत्‍येक गोष्‍टीचे कर्तेपण स्‍वतःकडे घेण्‍यास प्रवृत्त करते. ‘मी हे केले, हे माझ्‍यामुळे झाले’, ही त्‍याची उदाहरणे ! कर्तेपणा भगवंतचरणी समर्पित करण्‍याच्‍या प्रक्रियेस ‘शरणागती’ म्‍हणतात.

४. शरणागत होण्‍यामागील कारणे

४ अ. व्‍यावहारिक जीवन जगतांना ‘येणारी संकटे दूर व्‍हावीत’, या हेतूने संत किंवा गुरु यांना शरण जाण्‍याचा विचार येणे : माझ्‍या भाग्‍याने माझ्‍यावर थोडेफार चांगले संस्‍कार झाल्‍याने सज्‍जन, मोठ्या व्‍यक्‍ती आणि सत्‍पुरुष यांना शरण जाण्‍याचे बाळकडू लहानपणापासून मिळाले. व्‍यावहारिक जीवन जगतांना अपयश, निंदानालस्‍ती, आर्थिक चणचण, कौटुंबिक समस्‍या यांमुळे होणार्‍या त्रासांनी मी पिचून गेलो होतो. माझे मन सहानुभूती शोधत होेते. ‘संकटे दूर व्‍हावीत’, या प्रामाणिक अपेक्षेने मी मित्र, समाजातील व्‍यक्‍ती, ज्‍योतिषी, संत, तसेच गुरु अशा कुणालातरी शरण जाण्‍याच्‍या विचारात होतो. ‘माझ्‍यावर संकटे येण्‍याचेे प्रमाण अधिक असल्‍याने शरणागतीच पत्‍करायला हवी’, याची मला जाणीव होऊ लागली.

४ आ. गुरु किंवा ईश्‍वर यांना शरण न गेल्‍यामुळे अनेकांची साधनेतील घसरण पाहून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना शरण जाणे : साधनेचा प्रवास खडतर असल्‍याने स्‍वतःला उन्‍नत समजणारे भले भले साधक आणि संत हे त्‍यांचे गुरु किंवा ईश्‍वर यांना शरण न गेल्‍यामुळे त्‍यांची साधनेत घसरण झालेली आपण पहातो. व्‍यवहार आणि साधना यांतील टक्‍केटोणपे खाल्‍ल्‍यावर मी पूर्ण विचारांती सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाण्‍याचा मार्ग निवडला.

५. शरणागत स्‍थिती कशी निर्माण होईल ?

५ अ. गुरूंवर अतूट श्रद्धा हवी ! : शरणागती ही केवळ क्रिया नाही, तर ती उच्‍च कोटीची साधना आहे. ती स्‍थिती निर्माण होण्‍याचा ध्‍यास लागला पाहिजे. ‘मी गुरूंना शरण जाऊन त्‍यांच्‍या चरणी तन, मन आणि धन, असे सर्वकाही वाहिले आहे. त्‍यामुळे तेच मला कोणत्‍याही संकटातून बाहेर काढणार आहेत. मला कसलीही चिंता करायची नाही. ‘मी शरण गेलो आहे’, याचाही मला अहं बाळगायचा नाही.

५ आ. अहं-निर्मूलन प्रक्रिया मनापासून केल्‍याने शरणागत स्‍थिती निर्माण होणे शक्‍य ! : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना सांगितली असून शरणागत स्‍थिती निर्माण होण्‍यासाठी त्‍या अंतर्गत असलेली अहं-निर्मूलन प्रक्रिया महत्त्वाची आहे. अष्‍टांगसाधनेमुळे शरणागत स्‍थिती येण्‍यास गती मिळते. ‘गुरुचरणी समर्पित होणे’, ही भावना जोपासल्‍यास शरणागतीस प्रारंभ होतो.

६. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंनी निर्माण केलेल्‍या शरणागत भावामुुळेच जीवनात सकारात्‍मकता, सहजता आणि आनंद निर्माण होऊ लागणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी शरणागतीविषयी केवळ तात्त्विक माहिती सांगितली नाही, तर तेच माझ्‍यात शरणागतभाव निर्माण करत आहेत. जेव्‍हा माझ्‍या मनात निराशेचे ढग दाटून येतात, ‘मी हरलो कि काय ?’, असे वाटते किंवा ‘मी एकटा पडलो’, याची जाणीव मन पोखरू लाते, तेव्‍हा परात्‍पर गुरुदेवांनी आयुष्‍यभर कळत-नकळत मला दिलेले असंख्‍य आशीर्वाद, त्‍यांची शिकवण आणि संधी यांचे स्‍मरण होते. ‘त्‍यांनी माझ्‍या झोळीत चैतन्‍यासह सर्वकाही भरभरून घातले आहे. ते संपता संपत नाही’, या कृतज्ञतेच्‍या जाणिवेने मला त्‍यांच्‍या श्री चरणी शरण जाता येते. त्‍यांनी निर्माण केलेल्‍या शरणागत भावामुुळेच सकारात्‍मकता, सहजता आणि आनंद निर्माण होऊ लागला आहे.

वरील विवेचन म्‍हणजे मी अनुभवलेल्‍या अनेक प्रसंगांतून शिकायला मिळालेले अल्‍पसे सार आहे. मला कळकळीने सांगावेसे वाटते, ‘सांप्रतकाळी साधकांसाठी ‘शरणागती’ निर्माण होण्‍याचे सर्वोच्‍च श्रद्धास्‍थान म्‍हणजे ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले’ हेच आहेत.’ त्‍यांच्‍या चरणी शरण जाऊन कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.२.२०२३)