पुणे येथे अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करणार्‍या तरुणाला २० वर्षे सक्‍तमजुरी !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – चाकूच्‍या धाकाने अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करणार्‍या तरुणाला न्‍यायालयाने २० वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्‍कम न भरल्‍यास एक वर्षाचा अतिरिक्‍त कारावास भोगावा लागेल. तसेच आरोपीकडून येणार्‍या दंडाची रक्‍कम ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मुलीला देण्‍याचेही निकालात नमूद आहे. अर्जुन मलके असे शिक्षा झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. अत्‍याचार झालेल्‍या ११ वर्षीय मुलीच्‍या आईने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली होती. हा प्रकार एप्रिल २०१६ मध्‍ये घडला होता.

मलके हा तक्रारदार यांच्‍या मृत पतीचा मित्र होता. घटनेच्‍या दिवशी घरात मुलगी एकटीच असल्‍याचे पाहून मलके घरात शिरला आणि त्‍याने मुलीच्‍या गळ्‍यावर चाकू ठेवून तिला जिवे मारण्‍याची धमकी दिली. त्‍यानंतर त्‍याने मुलीशी अश्‍लील वर्तन करून, तिच्‍यावर अत्‍याचार केला. मुलीने हा सर्व प्रकार तिच्‍या आईला सांगितला. त्‍यामुळे तक्रारदार या मालकाकडे जाब विचारण्‍यासाठी गेल्‍या. त्‍या वेळी त्‍याने तक्रारदार यांना शिवीगाळ आणि मारहाण करून जिवे मारण्‍याची धमकी दिली. (यावरून समाजाची मानसिकता किती रसातळाला गेली आहे, हेच लक्षात येतेे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार करणार्‍या अशा नराधमांना त्‍वरित आणि कठोर शिक्षा झाल्‍यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल.