आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथे २ लाख भाविकांनी घेतले दर्शन !

प्रथमच मुखदर्शनाची सोय !

पैठण (जिल्‍हा छत्रपती संभाजीनगर) – आषाढी एकादशीनिमित्त जिल्‍ह्यातील पैठण येथे २ लाख भाविकांनी श्री पांडुरंगाची मूर्ती आणि नाथ पादुका यांचे दर्शन घेतले. पहाटे ४ वाजता येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्‍या वाड्यातील विजयी पांडुरंगाच्‍या मूर्तीला नाथ वंशजांच्‍या हस्‍ते महाअभिषेक करण्‍यात आला. पहाटे ४ वाजल्‍यापासून दक्षिण काशी म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या गोदावरी नदीत गोदास्नान करून विजयी पांडुरंगाच्‍या मूर्तीचे दर्शन घेतले. यानंतर नाथ पादुकांचे दर्शन घेण्‍यासाठी वारकर्‍यांची दिवसभर नाथ समाधी मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. या वेळी ‘देवा पाऊस पाडून सर्वांना सुखी कर’, अशी प्रार्थना वारकर्‍यांनी केली.

या वर्षी नाथ मंदिरात भाविकांना मुखदर्शन घेता यावे, याचीही व्‍यवस्‍था केली आहे. नाथ मंदिराचा परिसर, रस्‍ता, बसस्‍थानक परिसर, स्‍टेडियम या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्‍त होता. मंदिरात व्‍यवस्‍थापक अमोल जाधव, शहादेव लोहारे, पांडुरंग निरखे, खिस्‍ती, वाणी, निवारे आदींनी भाविकांना व्‍यवस्‍थित दर्शन घेता यावे, यासाठी आवाहन करत नियोजन केले. आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्‍यासाठी रात्री ११.३० वाजता नाथसागरातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले. यामुळे वारकर्‍यांना गोदावरी नदीत स्नान करता आले. चातुर्मास संपेपर्यंत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी भाविकांची मागणी आहे.