१. कुडाळ येथे असणार्या गुरुपौर्णिमेला प.पू. भक्तराज महाराज येऊ न शकणे
‘वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा कुडाळमध्ये होती. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज जेथे वास्तव्यास रहाणार होते, तेथे त्यांची सेवा करण्याचे दायित्व मी आणि श्री. उदय बर्वे यांच्याकडे होते. आम्हाला सांगितल्याप्रमाणे सेवेची यथाशक्ती सिद्धता केली होती. बराच वेळ होऊन गेला; परंतु प.पू. भक्तराज महाराज तेथे काही कारणामुळे येऊ शकले नाहीत.
२. प.पू. काणे महाराज येणार असल्याचे कळणे आणि प.पू. काणे महाराज आल्यानंतर त्यांनी साधकाची विचारपूस करून त्याला नामजप देणे
त्यानंतर आम्हाला सांगितले की, प.पू. काणे महाराज आणि त्यांच्या समवेत अजून एक साधक येत आहेत. आम्ही दोघे लगेच त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो. त्या दोघांना प.पू. भक्तराज महाराज यांच्यासाठी सिद्ध केलेल्या खोलीत घेऊन गेलो आणि त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. थोड्या वेळानंतर प.पू. काणे महाराज यांनी आम्हा दोघांना (मी आणि श्री. उदय बर्वे यांना) बोलावून घेतले आणि आमची विचारपूस केली. त्यांनी मला विचारले, ‘‘नामजप कोणता करता ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले की, मी ‘श्री लक्ष्मीनारायण ।’, असा जप करतो. तेव्हा त्यांनी सांगितले की, आता केवळ ‘श्री नारायण ।’, हा जप करा. अशा प्रकारे देवाने आम्हा दोघांना त्यांचा सत्संग दिला.
३. प्रेमभाव
प.पू. काणे महाराज यांच्या समवेत आलेल्या साधकाला त्यांनी गुरुपौर्णिमा उत्सव बघायला आणले होते आणि ते स्वतः त्या व्यक्तीची सर्व काळजी घेत होते. त्याला काय हवे – नको ते बघत होते.
४. प.पू. काणे महाराज गृहप्रवेश आणि सत्यनारायणाच्या महापूजेला येणे अन् त्यानंतर साधकाला डिचोलीला घेऊन जाणे
साखळी येथील ‘हाऊसिंग बोर्डा’मध्ये श्री. कृष्णा मराठे यांच्या घरात गृहप्रवेश आणि त्यांच्या शेजारी असलेल्या श्री. बाबा मराठे यांच्या घरात सत्यनारायणाची महापूजा होती. त्या वेळी प.पू. काणे महाराज श्री. बाबा मराठे यांच्याकडे आलेे होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना नमस्कार केला. काही वेळाने ते मला म्हणाले, ‘‘आता आपल्याला डिचोलीला जायचे आहे.’’ त्याप्रमाणे मी, प.पू. काणे महाराज आणि वाहनचालक असे तिघे जण डिचोलीला त्यांचे भक्त श्री. पत्की यांच्या घरी गेलो.
५. स्वतःसमवेत आलेल्या चालकाप्रती प्रेमभाव
त्या वेळी श्री. पत्कीकाका घरी नसल्याचे कळले. मग प.पू. काणे महाराज सौ. पत्कीकाकूंना म्हणाले, ‘‘आता घरात जे काही जेवण शिल्लक आहे, ते बघा आणि ते या चालकाला वाढा.’’ त्याप्रमाणे सौ. काकूंनी जे काही अन्न होते, ते चालकाला वाढले. त्याचे जेवण झाल्यावर प.पू. काणे महाराज म्हणाले, ‘‘आता आम्ही निघतो.’’ तेव्हा मला असे वाटले की, ‘त्या वाहनचालकाला पुष्कळ भूक लागली असावी; म्हणून त्याची भोजनाची सोय केली असावी’, तसेच सौ. पत्की यांच्याकडून त्यांनी अन्नदानही करून घेतले.
मला प.पू. (कै.) काणे महाराज यांच्याविषयी वरीलप्रमाणे चार शब्द लिहिता आले. यासाठी प.पू. (कै.) काणे महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. प्रकाश रा. मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०२२)