छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्‍या स्‍वेच्‍छानिवृत्तीचा अर्ज संमत !

आता शेती अवजारांमध्‍ये करणार संशोधन !

आयुक्‍त सुनील केंद्रेकर

छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांची मे २०२५ मध्‍ये निवृत्त व्‍हायचे असतांना त्‍यांनी २३ मास आधीच स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. २४ आणि २६ मे २०२३ या दिवशी त्‍यांनी अर्ज केला होता. तो संमत झाला असून ३ जुलै २०२३ या दिवशी पदभार अपर मुख्‍य सचिव महसूल यांच्‍या समुपदेशाने अन्‍य अधिकार्‍याकडे सोपवून ३ जुलै या दिवशी निवृत्त व्‍हावे, असे पत्र अपर मुख्‍य सचिव नितीन गद्रे यांनी पाठवले आहे. २८ जून या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाडा मुक्‍तिसंग्रामाच्‍या संदर्भात सादरीकरण करण्‍यासाठी केंद्रेकर मुंबईत असतांनाच त्‍यांचा अर्ज संमत झाला. आता केंद्रेकर शेती अवजारांसाठी संशोधन करणार आहेत.

संभाजीनगर खंडपिठात २७ जून या दिवशी पाणी योजनेवर सुनावणी झाली. त्‍या वेळी राज्‍याने त्‍यांचा मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज संमत केल्‍याचे अधिवक्‍ता काळे यांनी सांगितले. त्‍यावर खंडपिठाने पाणीपुरवठा योजनेच्‍या समितीत एक नागरिक म्‍हणून केंद्रेकर काम करण्‍यास सिद्ध आहेत का ? अशी तोंडी विचारणा केली. यासंबंधी केंद्रेकर यांना विचारण्‍यात यावे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.