देवाने सूक्ष्मातून प्रसाद देणे, नंतर एका साधिकेने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा प्रसाद दिल्यावर सूक्ष्मातून मिळालेल्या प्रसादाची आठवण येणे

‘जून २००५ च्या शेवटच्या आठवड्यात मला श्री विठ्ठलाची आठवण येत होती. श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील मूर्तीचे वर्णन मी बर्‍याच जणांकडून ऐकले होते. त्यामुळे ‘त्या मनोहर मूर्तीचे एकदा तरी दर्शन मिळावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनात बरेच दिवस हा विचार घोळत होता. काही दिवसांनी मी एका साधकाच्या घरी जात होतो. वाटेत मला आकाशातून काहीतरी आल्यासारखे वाटले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘देवाने माझ्यासाठी सूक्ष्मातून प्रसाद दिला आहे.’ ‘तो प्रसाद कसला आहे ?’, ते मला समजले नाही. त्यानंतर ‘मला तो प्रसाद ग्रहण करता येऊ नये’, यासाठी अनिष्ट शक्ती त्रास देऊ लागल्या. त्या वेळी ‘हा प्रसाद माझ्याकडून सूक्ष्मातून ग्रहण केला जाऊ दे’, अशी प्रार्थना केल्यानंतर मला प्रसाद ग्रहण करता आला. थोड्या वेळाने मी साधकाच्या घरी पोहोचलो. त्या वेळी तेथे आलेल्या एका साधिकेने मला श्री विठ्ठलाचा पंढरपूर येथील प्रसाद दिला. तो प्रसाद मिळाल्यावर थोड्या वेळापूर्वी देवाने सूक्ष्मातून दिलेल्या प्रसादाची मला आठवण झाली.’

– श्री. अजय केळकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक