वडिलांच्‍या निधनानंतर त्‍यांचा अंत्‍यविधी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमाजवळ झाल्‍याबद्दल साधिकेने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

‘६.७.२०२२ या दिवशी माझे वडील (अण्‍णा) महादेव इराप्‍पा पाटील (वय ८३ वर्षे) यांचे पनवेल येथील रुग्‍णालयात अल्‍पशा आजाराने निधन झाले. २५.६.२०२३ (आषाढ शुक्‍ल सप्‍तमी) या दिवशी त्‍यांचे प्रथम वर्षश्राद्ध झाले. माझ्‍या वडिलांच्‍या अंतिम काळात मला माझी गुरुमाऊली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा अनुभवता आली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता अर्पण करत आहे.

कै. महादेव पाटील

१. वडिलांचे निधन झाल्‍यावर तेथे उपस्‍थित आम्‍हा तिघी बहिणींना तेथील आधुनिक वैद्यांनी पुष्‍कळ सहानुभूती दाखवली आणि त्‍यांचे पार्थिव लवकर मिळण्‍याविषयी साहाय्‍य दर्शवले. गुरुकृपेने रुग्‍णालयाच्‍या देयकात सवलतही मिळाली.

२. वडिलांचा अंत्‍यविधी त्‍यांच्‍या अंतिम इच्‍छेनुसार देवद आश्रमाजवळ होणे

आम्‍ही ५ बहिणी आणि आई यांनी अण्‍णांचा अंत्‍यविधी देवद (पनवेल) येथील आश्रमात करण्‍याचे निश्‍चित केले. अण्‍णांचा अंत्‍यविधी त्‍यांच्‍या अंतिम इच्‍छेनुसार आश्रमापासून काही अंतरावरील स्‍मशानभूमीत झाला.

३. या काळात देवद आश्रमातील साधक आणि संत यांनी आम्‍हा कुटुुंबियांना अण्‍णांच्‍या अंत्‍यसंस्‍कारासाठी पुष्‍कळ साहाय्‍य केले.

४. देवाने वडिलांच्‍या पार्थिवावर अग्‍नीसंस्‍कार घडवून त्‍यांचा मृत्‍यूनंतरचा प्रवास सुखाचा करणे

वडिलांवर अग्‍नीसंस्‍कार करण्‍यात आला आणि अण्‍णांच्‍या मृत्‍यूनंतरचा प्रवास सुखाचा होण्‍यासाठी देवाने (गुरुमाऊलीने) त्‍यांची काळजी घेतली.

५. माझे वडील मागील ७ – ८ वर्षे दिवसातून ५ – ६ घंटे परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रोपाय अतिशय श्रद्धेने करत होते. त्‍याचा परिणामस्‍वरूप अण्‍णांची मायेतील आसक्‍ती न्‍यून झाली होती.

६. वडील (अण्‍णा) मला सतत म्‍हणत होते, ‘‘माझा शेवट आश्रमात व्‍हावा. मी सांगलीला जाणार नाही. (सांगलीला वडिलांचे घर आणि शेती आहे.)’’ गुरुमाऊलींनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्‍यांची अंतिम इच्‍छा पूर्ण केली.

७. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले साधक आणि त्‍यांचे नातेवाईक यांचा भार वहातात’, हे लक्षात येऊन कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

खरेतर मी सनातनची एक सामान्‍य साधिका आहे. वर्ष २००० पासून मी आश्रमात राहून सेवा आणि साधना करत आहे. आरंभी माझ्‍या आई-वडिलांचा माझ्‍या साधनेला विरोध होता; परंतु कालांतराने तो उणावत गेला. मला भाऊ नाही. त्‍यामुळे मला पुष्‍कळ वेळा वाटायचे, ‘आई-अण्‍णांच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांना पुढील गती गुरुमाऊलीच्‍या चरणी मिळावी.’ या विचारांची पूर्ती करत गुरुमाऊलीने माझ्‍या वडिलांचे अंत्‍यसंस्‍कार त्‍यांच्‍या आश्रमाजवळ करून घेतले. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर साधक आणि त्‍यांचे नातेवाईक यांचाही भार वहातात’, हे माझ्‍या लक्षात आले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची कृपा शब्‍दांतून सांगता येत नाही. ही कृपा सनातनचा प्रत्‍येक साधक अनुभवत असतो. ‘अशी गुरुमाऊली मिळणे’, ही केवळ अनेक जन्‍मांची पुण्‍याई आहे. गुरुमाऊलीच्‍या चरणी निःशब्‍द भावाने कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल (२०. ६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक