पहिने (जिल्‍हा नाशिक) येथील इंग्रजी शाळेच्‍या वसतीगृहातील मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले !

 नकार दिल्‍यास छड्यांनी मारहाण करणार्‍या शिक्षिकेविरोधात गुन्‍हा नोंद !

नाशिक – जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात एका वसतीगृहातील अल्‍पवयीन मुलींना सायंकाळी आणि रात्री पर्यटकांंसमोर नाचवण्‍यात आले. या प्रकरणी संस्‍थेचे चालक आणि शिक्षिका यांच्‍याविरुद्ध वाडीवर्‍हे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पहिने येथे ही घटना घडली आहे.

मुलींची पालकांकडे तक्रार !

पहिने येथे एका खासगी संस्‍थेची काही वर्षांपासून इंग्रजी माध्‍यमाची शाळा आहे. याच शाळेद्वारे यंदा मुलींसाठी वसतीगृह चालू करण्‍यात आले. शाळा चालू होण्‍यापूर्वी इयत्ता ७ वी ते ९ वीपर्यंतच्‍या मुलींना या वसतीगृहात प्रवेश देण्‍यात आला. शाळा चालू होण्‍यापूर्वी मुलींना पारंपरिक नृत्‍य आणि संगणक यांचे शिक्षण दिले जाणार असल्‍याचे सांगत संस्‍थेने पालकांकडून ३ सहस्र ५०० रुपये अनामत रक्‍कम घेतली. संस्‍थेच्‍या शाळेमागील टेकडीवर उपाहारगृह आहे. तेथे मेच्‍या शेवटी काजवे पहाण्‍यासाठी पर्यटक येतात. ‘त्‍यांच्‍यासमोर सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत बळजोरीने नाचण्‍यास सांगितले जाते’, असा आरोप वसतीगृहातील मुलींनी केला आहे. नाचले नाही, तरी शिक्षिका संस्‍थाचालकांच्‍या सांगण्‍यावरून दमदाटी करतात आणि छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. त्‍यानंतर संतप्‍त पालकांनी मुलींना घरी आणत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

शिक्षिकांनी आरोप फेटाळले !

मुलींना बळजोरीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्‍याचा आरोप वसतीगृहाचे चालक आणि तेथील शिक्षक यांनी फेटाळून लावला आहे. आरोपांविषयी एका शिक्षिकेने सांगितले आहे की, आम्‍ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्‍य शिकवतो. त्‍यांना इतरांसमोर नाचण्‍यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्‍य शिकवत असतांना कदाचित पर्यटक ते पहात असतील, एवढेच. यासंदर्भात पुढे काळजी घेऊ.

संपादकीय भूमिका

पालकांनो, इंग्रजी शाळांचे खरे स्‍वरूप जाणून आपल्‍या पाल्‍यांना अशा शाळांमध्‍ये घालायचे का ? हे ठरवा !