‘मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्या काळात स्वच्छता सेवेच्या अंतर्गत मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा करायला मिळाली. त्या वेळी सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीतील निर्जीव वस्तूंनी साधकाला साधना होण्यासाठी सांगितलेली सूत्रे खोलीतील प्रत्येक वस्तू माझ्याशी बोलत होती.
अ. खोलीतील गादी मला म्हणाली, ‘तुमचे भाग्य आणि तुमची अनेक जन्मांची पुण्याई आहे. आता या सेवेच्या माध्यमातून गुरुकृपा प्राप्त करून घ्या.’
आ. मला प्रत्येक खिडकीच्या कोपर्यातून आवाज येत होता. मी खिडकीची काच पुसतांना ती मला म्हणाली, ‘या सेवेच्या माध्यमातून तुम्ही चित्त आणि देह यांची शुद्धी करून घ्या.’
इ. खोलीतील लादी ‘मॉपने’ पुसत असतांना लाद्या मला म्हणाल्या, ‘या खोलीत सर्व देवता असतात. त्यांचा अधिकाधिक लाभ करून घ्या.’
ई. खोलीत असलेल्या कचर्याने मला सांगितले, ‘तू अधिकाधिक शरणागतभावाने साधना केलीस, तरच पुढचे टप्पे गाठू शकशील.’ त्या क्षणी मी तसे प्रयत्न करण्याचा निश्चय केला.’
उ. मी खोलीतील आरसा पुसतांना तो मला म्हणाला, ‘प्रत्येकामध्ये परात्पर गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) रूप पहा.’ मी त्या वेळी आरशाला सांगितले, ‘‘हो, मी तसेच प्रयत्न करतो.’’ तेव्हापासून मला प्रत्येक साधकामध्ये परात्पर गुरुदेवांचे आपोआप दर्शन होत असते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीत सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती
अ. मला सर्व लाद्या गुलाबी दिसत होत्या.
आ. मला खोलीत चंदनाचा आणि गुलाबाचा सुगंध आला.
इ. खोलीत स्वच्छतेची सेवा करत असतांना ‘पार्वतीमातेचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वतावर सेवा करत आहे’, असे मला जाणवत होते.
ई. मला खोलीच्या प्रत्येक कोपर्यातून ‘ॐ’चा नाद ऐकू येत होता आणि शिवाचे अस्तित्व जाणवत होते.
खोलीत सेवा करत असतांना प्रत्येक वस्तूकडून ‘आनंदी जीवन कसे जगावे ? आपले विचार कसे असावेत ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘हे भगवंता, माझा प्रत्येक विचार आणि कृती तुझ्या चरणांशी अर्पण करून घे. तूच माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना करून घे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. ज्ञानेश्वर आप्पाना गावडे, गवेगाळी, बेळगाव. (११.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |