येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांत पाऊस पडणार ! – हवामान खाते

नवी देहली – येत्या पंधरवड्यात देशातील १६ राज्यांमध्ये मोसमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. १९ जूनपासून काही राज्यांत पावसाला आरंभ झाला असून यामध्ये देहली, बिहार, पूर्व उत्तरप्रदेश आणि बंगालच्या किनारपट्टीचा भाग यांचा समावेश आहे. आसाम, उप-हिमालयीन बंगाल, सिक्किम, पश्‍चिम मध्यप्रदेशात पुढील २४ घंट्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

पुढील २ दिवस मध्यप्रदेशसह १० राज्यांमध्ये उष्णतेची लाट !

हवामान खात्याच्या अनुमानानुसार पुढील दोन दिवस उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, बंगाल, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडू या १० राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. या राज्यांना तशी चेतावणी (अलर्ट) देण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.

देहली, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गंगाक्षेत्र असलेला बंगाल आणि ईशान्येकडील आठ राज्ये येथे पुढील १५ दिवसांत मुसळधार अन् सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली !

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ देशात पावसाची न्यूनता भरून काढत आहे. केवळ उत्तर-पश्‍चिम भारतात नेहमीपेक्षा ३७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. बिपरजॉयमुळे गेल्या ४ दिवसांत गुजरात आणि राजस्थान येथे इतका पाऊस पाडला आहे की, त्यामुळे मोसमी पावसाची २० टक्के तूट भरून निघाली आहे.