‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !
नवी देहली – ‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादावरून विशेषतः हनुमानाच्या संवादावरून होणार्या टीकेवर संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी म्हटले की, आताच्या पिढीला संवाद कळावेत; म्हणून तशा भाषेत ते लिहिले आहेत. केवळ हनुमानाविषयीच का बोलले जात आहे ? भगवान श्रीरामाच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेचे संवाद जिथे ती आव्हान देते त्याविषयी बोलले पाहिजे, असे सांगत त्यांनी संवादांचे समर्थन केले.
सौजन्य: Republic World
‘संवाद जाणीवपूर्वक लिहिण्यात आले आहेत का ?’ असे विचारले असता मनोज मुंतशीर शुक्ला म्हणाले की, निश्चितच हे संवाद जाणीवपूर्वक असे लिहिण्यात आले आहेत. हनुमानाचे संवाद पूर्ण विचार करून लिहिले आहेत. आम्ही ते सोपे ठेवले आहेत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, चित्रपटात अनेक पात्रे असतील, तर प्रत्येकाला एकच भाषा बोलता येत नाही. त्यामध्ये वैविध्य असेल. आम्ही लहानपणापासून रामायण ऐकत आलो आहोत. मी एका छोट्या गावातून आलो आहे. आमच्या गावी आमची आजी जेव्हा गोष्टी सांगायची, तेव्हा ती याच भाषेत सांगायची. या देशाचे महान संत, या देशातील महान कथाकार मी लिहिल्याप्रमाणे संवाद बोलतात. असे संवाद लिहिणारा मी पहिला नाही, ते पूर्वीपासून म्हटले जात आहेत.
काय आहे आक्षेपार्ह संवाद ?
हनुमानाचा लंकादहन प्रसंग दाखवतांना त्याच्या तोंडी ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की’ असा संवाद आहे. हा संवाद ऐकून प्रेक्षकांनी संताप व्यक्त करण्यास चालू केले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या पिढीला काय समजणार आणि काय समजणार नाही, यापेक्षा रामायणाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊनच संवाद लिहिण्याची आवश्यकता होती; मात्र ‘आपल्याला सर्वकाही कळते’ या विचारांतून अशा प्रकारची कृती करण्यात आली आहे, हेच स्पष्ट होते ! |