सातारा, १३ जून (वार्ता.) – कास, महाबळेश्वर आणि पाचगणी येथील अतिक्रमणांविषयी कायदेशीर सूत्रे तपासूनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केले. येथील नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी दुडी पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी जयवंशी यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमांमुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी चालू केलेले उपक्रम आणि चांगल्या परंपरा कायम ठेवल्या जातील. सध्या मी सातारा जिल्ह्याचा अभ्यास करत असून सर्व विभागांच्या बैठका लवकरच घेण्यात येतील. जिल्ह्यातील अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. सामान्य नागरिकांना कोणतीही आडकाठी न आणता त्यांची शासकीय कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील. कास, महाबळेश्वर आणि पाचगणी येथील अतिक्रमणे केलेल्या भागांची मी स्वत: पहाणी करणार आहे, तसेच कागदपत्रे पडताळणी करणार आहे. या प्रकरणी कायद्याचा सन्मान राखून योग्य ती कारवाई करण्यात येईल.