‘मी गेल्या ४ – ५ मासांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग सेवेत सहभागी झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळे मी ही सेवा करत आहे. मी सत्संग सेवेत सहभागी झाल्यावर मला आरंभी सेवेची व्याप्ती पाहून ताण आला. ‘इतकी मोठी सेवा करायला मला जमेल का ?’, असा विचार आला. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि सहसाधकांच्या साहाय्याने तो ताण न्यून झाला. आता मला सेवेतील आनंद अनुभवता येत आहे. गुरुदेवा, प्रत्यक्ष साधक निर्मितीच्या या सेवेत केवळ तुमचा संकल्प कार्यरत असल्यामुळे साधक ही सेवा अत्यंत सहज आणि आनंदाने करत आहेत. गुरुदेवा, तुमच्या संकल्पामुळे आम्हाला तयार साधकच मिळत आहेत. ‘तुम्हीच आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवत आहात’, याची जाणीव होत आहे आणि गुरुदेवांचे समष्टी रूप पाहून मन कृतज्ञतेने भरून येते. ही सेवा करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘ऑनलाईन’ सत्संग सेवा करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा एकटीने करणे अशक्य आहे. त्यासाठी अनेक साधकांच्या साहाय्याची आवश्यकता असते. तांत्रिक सेवा करणारे साधक, सत्संगात भ्रमणभाषवरील ध्वनीक्षेपण (माईक) चालू-बंद करणे, प्रत्यक्ष सत्संग घेणारे सत्संगसेवक आणि या सर्वांचा समन्वय करण्यासाठी जिल्हा सत्संग समन्वयक असतात. या सर्वांच्या साहाय्याने एक सत्संग घेता येतो. यातून संघटितपणा हा गुण शिकायला मिळाला.
आ. हा सत्संग ‘ऑनलाईन’ असल्यामुळे सत्संग वेळेत चालू करावा लागतो. यामुळे ‘वक्तशीरपणा’, हा गुण वाढण्यासाठी साहाय्य झाले.
इ. ‘सत्संगातील सर्व जिज्ञासू माझे आहेत, त्यांच्या साधनेतील अडचणी माझ्या आहेत आणि त्यांना साधना सांगायची आहे’, असे वाटून त्यांच्याप्रती प्रेमभाव वाढला.
ई. सत्संगात विषय मांडतांना गुरुदेवांची चैतन्यमय वाणी अनुभवता यावी, यासाठी व्यष्टी साधनेचे प्रयत्न आरंभ झाले. ‘मी व्यष्टी साधना चांगली केली, तरच जिज्ञासूंना साधना सांगू शकते’, याची जाणीव होऊन माझ्या साधनेत ‘सातत्य’, हा गुण येण्यास साहाय्य झाले.
गुरुदेवांच्या कृपेमुळे या सेवेच्या माध्यमातून तत्परता, इतरांचा विचार करणे, प्रांजळपणा, चुकांविषयी संवेदनशीलता, सेवेची तळमळ, देवाशी अनुसंधानात रहाणे, गुरुदेवांप्रती भाव इत्यादी अनेक गुणांची वृद्धी होत आहे.
२. ‘सत्संगाच्या प्रत्येक संहितेचा अभ्यास करतांना ती संहिता माझ्यासाठीच आहे. मला ते कृतीत आणायचे आहे’, याची सतत जाणीव होते. ‘संहितेच्या माध्यमातून गुरुदेवच मार्गदर्शन करतात’, हे अनुभवता येत आहे.
३. अनुभूती – पोळीवर ‘ॐ’ उमटणे
मी वरील सूत्रे लिहिण्यापूर्वी त्यांचे चिंतन करत असतांना मी स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होते. तेव्हा पोळी भाजतांना मला प्रत्येक पोळीवर ‘ॐ’ उमटलेला दिसला. त्यातील एका पोळीवर ३ – ४ ‘ॐ’ उमटलेले दिसले. तेव्हा गुरुदेवांनी मला निर्गुण तत्त्वाची अनुभूती दिली, याबद्दल पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
‘गुरुदेवा, मी अज्ञानी आहे. मला अजून पुष्कळ शिकायचे आहे. मला सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे. तुमच्या कृपेने ‘माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला इतक्या मोठ्या सेवेत सहभागी होता आले’, हे माझे भाग्यच आहे ! गुरुदेवा, मला तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी शक्ती आणि बुद्धी तुम्हीच द्या’, अशी आपल्या ब्रह्मांडव्यापी चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. दीपा अमित औंधकर , रत्नागिरी (१२.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |