छत्रपती संभाजीनगर येथील कु. मोक्षदा देशपांडे हिला इयत्ता १० वीत ९६.४० टक्के !
छत्रपती संभाजीनगर, ८ जून (वार्ता.) – येथील सनातनची साधिका कु. मोक्षदा देशपांडे हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून शाळेतून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. कु. मोक्षदा ही येथील सनातनचे साधक श्री. महेश आणि सौ. कल्पना देशपांडे यांची मुलगी आहे. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या) कृपेमुळे हे शक्य झाले’, असे तिने सांगितले. प्रार्थना आणि नामजप करूनच ती अभ्यासाला बसायची.
पुणे येथील कु. ऋग्वेद जोशी याला दहावीत ९२.६० टक्के गुण !
संस्कृत विषयात १०० पैकी ९७ गुण !
पुणे, ८ जून (वार्ता.) – एस्.एस्.सी. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. ऋग्वेद जोशी याने ९२.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्याला संस्कृत विषयात १०० पैकी ९७ गुण मिळाले आहेत. सनातनचे साधक श्री. नीलेश जोशी आणि सौ. प्रीती जोशी यांचा ऋग्वेद हा मुलगा आहे.
कु. ऋग्वेद याने त्याच्या यशाविषयी बोलतांना सांगितले की,
१. इयत्ता दहावीचा अभ्यास चैतन्यमय वातावरणात प्रारंभ होणे !
इयत्ता दहावीचे संपूर्ण वर्ष म्हणजे माझ्यासाठी गुरुकृपेचा वर्षाव होता ! या कालावधीत गुरूंच्या विविध लीला अनुभवायला मिळाल्या. एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत रामनाथी आश्रमात दीड मासासाठी सेवेची संधी मिळाली, तसेच दिव्य रथोत्सव प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. वर्षाच्या आरंभीलाच भरभरून चैतन्य मिळाले !
२. गुरुकृपेने तणावविरहित अभ्यास होणे !
संपूर्ण वर्षभर अभ्यास करतांना मला एकदाही ताण आला नाही. अभ्यास बराच असायचा; पण प्रार्थना, तसेच उपाय केल्यावर तो अभ्यास कधी व्हायचा ? हे मलाच समजायचे नाही. जेव्हा एखादा ‘प्रोजेक्ट’ किंवा ‘असाईनमेंट’ दिली जायची, तेव्हा अजिबात ताण यायचा नाही. उलट सहजतेने तो अभ्यास पूर्ण व्हायचा.
३. परीक्षेच्या कालावधीत गुरूंचे साहाय्य लाभणे !
परीक्षेचा अभ्यास करतांना मला गुरुदेवांचा आवाज ऐकू यायचा. ते मला परीक्षेतील प्रश्नांविषयी मार्गदर्शन करत आणि पुढच्या दिवशी परीक्षेमध्येही तेच प्रश्न असायचे. पेपर लिहित असतांना गुरुच माझ्या शेजारी बसले आहेत, या भावाने मी पेपर लिहायचो. पेपर लिहितांना गुरुदेवच मला आतून उत्तरे सांगायचे.
४. गुरुकृपेने सेवा होणे !
या संपूर्ण कालावधीत गुरूंच्या कृपेने मला सेवेची संधी मिळाली. ‘इमेज पोस्ट’ तसेच ‘व्हिडिओ’ बनवणे, ‘इमेज पोस्ट’ तपासणे, ‘व्हिडिओ एडिटिंग सेवा’, ‘यूट्यूब लाईव्ह सेवा’, सामाजिक माध्यम सेवा इत्यादी सेवा चालू होत्या. अभ्यासाचे तसेच सेवेचे योग्य नियोजन कसे करावे ?, हे गुरुदेवच मला आतून सुचवायचे आणि त्यानुसार कृती केल्यामुळे त्यातून आनंद मिळायचा. परीक्षेच्या कालावधीत प्रतिदिन सकाळी नामजप सत्संगाची ‘यूट्यूब लाईव्ह सेवा’ असायची. रात्री अभ्यासामुळे झोपायला उशीर व्हायचा; पण झोपतांना प्रार्थना केल्यावर सकाळी ५. ३० वाजता सेवेसाठी आपोआप जाग यायची आणि सेवा करून मी पेपर लिहिण्यासाठी जायचो.
५. समष्टी सेवेचा लाभ सर्वच स्तरांवर होणे !
परीक्षा कालावधीत असे लक्षात आले की, समष्टी सेवांचा लाभ सर्वच स्तरांवर होत आहे. सेवा करून अभ्यासाला बसल्यावर देवाच्या अनुसंधानात राहून अभ्यास व्हायचा. सेवा केल्यामुळे मन आनंदी आणि एकाग्र व्हायचे आणि अभ्यास चांगल्या प्रकारे होत असे. ‘गुरुदेवच माझ्याकडून अभ्यास करून घेत आहेत’, असा भाव ठेवल्याने अभ्यास लवकर व्हायचा !
६. गुरुकृपेने निकालाचाही काहीही ताण नसणे !
‘गुरुदेवांनीच माझ्याकडून पेपर लिहून घेतला आहे, पेपर तपासणारेसुद्धा गुरूच आहेत आणि त्यांच्याच कृपेने मला गुण मिळणार आहेत’ असा भाव ठेवल्यामुळे निकालाचा अजिबात ताण आला नाही. निकाल पाहून गुरुचरणी कृतज्ञता वाटली !
७. परीक्षा केंद्रावर जाण्याआधी प्रार्थना करणे !
परीक्षा केंद्रावर जाण्याआधी मी प्रतिदिन पुढील प्रार्थना करायचो. ‘गुरुदेवा, मला तर काहीच येत नाही, तुम्हीच माझ्याकडून पेपर लिहून घ्या, मी तर अज्ञानी जीव आहे, तुम्हीच या आणि माझ्याकडून पेपर लिहून घ्या.’ अशी प्रार्थना केल्यावर देवघरात असलेल्या गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर गुरुदेव माझ्याकडे बघून स्मितहास्य करत आहेत असे जाणवायचे.
८. परीक्षा कालावधीत संतांचे चैतन्य सोबत असणे !
परीक्षेच्या काही दिवस आधी मी पू. गोखलेआजींकडे त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मला परीक्षेसाठी एक लेखणी दिली. मी त्याच लेखणीने पेपर लिहायचो, त्या वेळी ‘संतांचे चैतन्य या लेखणीच्या माध्यमातून आहे, गुरुदेव माझ्या सोबत आहेत’, असे वाटायचे ! हे यश केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच शक्य झाले आहे, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता व्यक्त करतो !
गुरुदेवांप्रतीचा भाव, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा ही ऋग्वेदची गुणवैशिष्ट्ये ! – पू. (सौ.) मनीषा पाठक, पुणे
अभ्यास, साधना आणि सेवा यांचा सुरेख संगम साधून ऋग्वेदने शालांत परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. याविषयी त्याचे विशेष कौतुक वाटते ! दहावीच्या वर्षी अगदी पेपर चालू असतांनाही तो समष्टी सेवा करत होता. साधनेचे नियमित प्रयत्न, गुरुदेवांप्रतीचा भाव, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा ही ऋग्वेदची गुणवैशिष्ट्ये आहेत !
पुणे येथील कु. निधी शंभू गवारे हिला दहावीत ८३.८० टक्के गुण !
पुणे, ८ जून (वार्ता.) – इयत्ता १० वीच्या परीक्षेमध्ये येथील सनातनची साधिका कु. निधी शंभू गवारे हिने ८३.८० टक्के गुण प्राप्त केले आहेत. सनातनच्या साधिका सौ. रूपाली गवारे आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर समन्वयक श्री. शंभू गवारे यांची निधी ही कन्या आहे. निधी पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिक्षण घेत आहे.
कु. निधीने तिच्या यशाविषयी बोलताना सांगितले की, मला आधी परीक्षेची भीती वाटून दडपण आले होते. अभ्यासातही लक्ष केंद्रित होत नव्हते. त्यानंतर मी स्वयंसूचना घेणे चालू केले, तसेच नियमित नामजपही केला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला याचा पुष्कळ लाभ झाला आणि माझा आत्मविश्वास वाढून अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होऊ लागले. माझ्या मनातील परीक्षेची भीती निघून गेली. अभ्यास आणि साधना मी सहजतेने करू शकले. यात मला आईचेही पुष्कळ साहाय्य झाले. आज जे काही गुण मिळाले आहेत ते केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मिळाले आहे. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.
कुमारी निधीची आई सौ. रूपाली गवारे यांनी निधीच्या यशाविषयी बोलतांना सांगितले की, निधी प्रारंभी अभ्यास गांभीर्याने करत नव्हती; मात्र गुरुदेवांच्या कृपेने नंतर तिने स्वतः मधे पालट केला आणि त्यांच्या कृपेनेच तिला चांगले गुण मिळाले. त्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.