रेल्‍वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करून वाहतूक सुरक्षित करणार ! – उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (मध्यभागी)

सातारा, ७ जून (वार्ता.) – राज्‍यातील ९ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा आणि ११ उड्डाणपुलांचा भूमीपूजन सोहळा नुकताच पार पडला. लोकार्पण झालेल्‍या उड्डाणपुलांपैकी २ उड्डाणपूल हे सातारा जिल्‍ह्यातील आहेत. जिल्‍ह्यातील एका भुयारी मार्गाचेही भूमीपूजन झाले. रेल्‍वे फाटकांऐवजी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करून वाहतूक सुरक्षित करण्‍यात येईल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्‍हटले आहे की, सातारा जिल्‍ह्यात पाटण-पंढरपूर रस्‍त्‍यावर मसूर आणि शिवरवडे रेल्‍वेस्‍थानकामध्‍ये फाटक क्रमांक ९२ ऐवजी दोन पदरी उड्डाणपूल उभारण्‍यात आला आहे. तसेच सातारा-रहिमतपूर रस्‍त्‍यावर फाटक क्रमांक ८१ ऐवजी दोन पदरी उड्डाणपूल उभारण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील कोळवड-रेवडी रस्‍त्‍यावर पळशी ते जरंडेश्‍वर रेल्‍वे स्‍थानकामध्‍ये फाटक क्रमांक ५२ ऐवजी भुयारी मार्ग निर्माण करण्‍यात येणार आहे. या मार्गाचा भूमीपूजन कार्यक्रम ४ जून या दिवशी पार पडला.

‘रेल्‍वे क्रॉसिंग’जवळ नेहमीच वाहतूककोंडी होते. विशेषत: साखर कारखान्‍यांच्‍या हंगामात वाहतूककोंडीचे प्रमाण अधिक असते. जिल्‍ह्यातील वाढती वाहतूक विचारात घेता यापुढेही सेतूबंधन योजने अंतर्गत उड्डापूल आणि भुयारी मार्ग यांच्‍या निर्मितीसाठी मी प्रयत्नशील असणार आहे, असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.