जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

  • जळगाव येथे पत्रकार परिषद !

  • यावलमधील श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर आदी मंदिरांचा समावेश !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

जळगाव – नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर) यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. त्यासंदर्भात यापूर्वीच वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेल्या श्री ओंकारेश्‍वर मंदिर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ५ जून या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री बालाजी मंदिर (पारोळा), श्री मनुदेवी मंदिर (यावल), श्री पद्मालय देवस्थान (एरंडोल) या मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत येत्या आठवड्यात, तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या ३ मासांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी या वेळी सर्वांना संबोधित केले.

जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू माहिती देतांना डावीकडून जुगल किशोर जोशी, अधिवक्ता भरत देशमुख, सद्गुरू नंदकुमार जाधव, श्री. केशव क्षत्रिय, श्री. प्रशांत जुवेकर, डॉ. पांडुरंग पिंगळे, श्री. भैयासाहेब शिंपी आणि श्री. नीळकंठ चौधरी

विविध मान्यवरांची मते !

१. श्री. केशव क्षत्रिय, विश्‍वस्त, श्री बालाजी मंदिर, पारोळा : भारतीय वस्त्रे पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत.

२. श्री. नीलकंठ चौधरी, सचिव, सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिर, यावल : मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरांची संस्कृती, पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून येऊ नये’, अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही वस्त्रसंहिता लागू करत आहोत. यासाठी श्री मनुदेवी मंदिर, यावल येथे फलक लावत आहोत.

३. ज्येष्ठ विधीज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विधी सल्लागार आणि ‘महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिल’चे माजी अध्यक्ष : ‘मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे असे नाही. मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे. भारतीय वस्त्रे परिधान केल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्रनिर्मिती करणार्‍या उद्योगांना चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका आहे.’’

जळगाव येथील ओंकारेश्‍वर मंदिराचे श्री. जुगल किशोर जोशी आणि एरंडोल येथील प्राचीन श्री पद्मालय मंदिराचे विश्‍वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

 

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याकडून मार्गदर्शन

सद्गुरु नंदकुमार जाधव

या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘वस्त्रसंहितेचे आध्यात्मिक स्तरावर काय महत्त्व आहे ?’, हे विशद करून ‘वस्त्रसंहितेचे पालन करणार्‍याला मंदिरात दर्शन घेण्याचा लाभ कसा होतो ?’, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक – 

वस्त्रसंहिता लागू होणार असलेली मंदिरे !

१. श्री ओंकारेश्‍वर मंदिर, जळगाव
२. श्री बालाजी मंदिर, पारोळा
३. महर्षि व्यास मंदिर, यावल
४. श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल
५. कष्टभंजन देव हनुमानजी मंदिर, सूनसावखेडा
६. सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, यावल
७. श्रीराममंदिर, पारोळा
८. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पिंपरी, जामनेर
९. श्री मारुति मंदिर, प्रजापतीनगर, जळगाव
१०. पंचमुखी मारुती मंदिर, जळगाव
११. श्री शनी मंदिर, सिंधी कॉलनी, जळगाव
१२. दक्षिणमुखी मारुति मंदिर, गोलानी मार्केट, जळगाव
१३. उमा महेश्‍वर मंदिर, उमाळे, ता.जि. जळगाव
१४. शिवधाम मंदिर, जळगाव
१५. इच्छादेवी मंदिर, जळगाव
१६. कालिंकामाता मंदिर, जळगाव
१७. सूर्यमुखी हनुमान मंदिर, विवेकानंद नगर, जळगाव
१८. अष्टभुजा मंदिर, भुसावळ
१९. स्वयंभू श्री मुजुमदार गणपति मंदिर, चोपडा
२०. हरेश्‍वर महादेव मंदिर, चोपडा
२१. बालवीर हनुमान मंदिर, चोपडा
२२. नवग्रह मंदिर, शेतपुरा, चोपडा
२३. श्री वरद विनायक मंदिर, प्रेमनगर, जळगाव
२४. श्री गजानन महाराज मंदिर, बांभोरी
२५. सातपुडा निवासिनी श्री भवानीमाता मंदिर, कुसुम्बा, रावेर
२६. श्री साई मंदिर, तुळसाई नगर, जळगाव

यांसह दसनूर येथील मंदिर, पाचोरा येथील २ मंदिरे आणि भादली येथील ६ मंदिरे, येथे वस्त्रसंहिता लागू होणार आहे.