१. त्रेता आणि द्वापर युगांतील श्रीराम !
आतापर्यंतच्या नामाच्या आधारे श्रीरामाचे लोभस असे पुरुषार्थ वैभवाने परिपूर्ण रूप श्रीसमर्थांनी आपल्या समोर उभे केले. श्रीसमर्थ रामाच्या जीवितकार्याचे वर्णन करत आहेत. ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ।’ असे भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्णाने सांगितले आहे. राम अवतार यापूर्वीचा त्रेतायुगातील आहे. अर्जुनाला गीतेचा उपदेश करणारे श्रीकृष्ण रामावतारात गुरुवर्य वसिष्ठांनी केलेल्या उपदेशाचे, योगवासिष्ठ्याचे उत्तम श्रोते आहेत. ‘आज्ञापालन’ हा श्रीरामाचा विशेष गुण आहे आणि जीवनभर त्याने तो आचरणात आणला.
२. धर्म म्हणजे काय ?
‘धर्म’ या शब्दाच्या अनेक व्याख्या वेदवाड्.मयात दिलेल्या आहेत. ‘चोदना लक्षणोदी धर्म: ’ (अर्थ – वेदांच्या नियमांमध्ये सांगितलेली कृती म्हणजे धर्म !) चोदना म्हणजे आज्ञाधारक प्रेरणा, तत्त्ववेत्त्या महापुरुषांनी मनुष्य जन्माला आल्यानंतर करायची कर्तव्यकर्मे आणि त्याविषयीचे केलेले मार्गदर्शन, तसेच त्याचे यथार्थ पालन याला ‘धर्म’ म्हणतात. ‘धारणाद्धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः ।’ (म्हणजेच जे स्वीकारायचे आहे आणि जे लोकांनी स्वीकारले आहे, तो धर्म आहे.’)
३. श्रीरामाप्रमाणे व्यवहार करणे हाच धर्म !

श्रीरामाने स्वतःच्या आचरणातून समाजापुढे आदर्श ठेवला. समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ जसे आचरण करतात, त्याचे अनुकरण इतर करतात. यक्षाने धर्माला ‘धर्म म्हणजे काय ?’, असे विचारले, तेव्हा ‘महानुभाव जातील, तो मार्ग म्हणजे धर्म !’ असे धर्मराजाचे उत्तर आहे. श्रीसमर्थ म्हणतात, ‘धर्मस्थापनेचे नर हे ईश्वरी
अवतार ! श्रीरामाचे संपूर्ण जीवन हे मानवी जीवनाचे आदर्श घालून देणारे आहे.’ महर्षी वसिष्ठ रामकथेत रामाविषयी सांगतात, ‘रामोविग्रहवान धर्मः ।’ (अर्थ – राम धार्मिकतेचा अवतार आहे.) धर्म म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी वेगवेगळे धर्मग्रंथ, सगळे वेद, शास्त्रे, पुराणे वाचायची आवश्यकताच नाही. ‘रामादिवत् वर्तितव्यम् श्रीराम’ म्हणजे श्रीरामाप्रमाणे व्यवहार करायला हवा, हाच साक्षात् धर्म होय.
४. रावणाची दहशत पाहून श्रीराम व्यथित होणे
श्रीरामचरित्र वाचा, समजून घ्या ! श्रीरामासारखे वागण्याचा प्रयत्न करणे, आचरणात उतरवणे, श्रीरामाचे अनुकरण करणे हाच धर्म होय. श्रीरामजीवनातील एक प्रसंग महत्त्वाचा आहे. वयाच्या ९ व्या वर्षी गुरु वसिष्ठांच्या गुरुकुलात रामादी भावंडांचे अध्ययन पूर्ण झाले, तेव्हा राज्यकारभारात लक्ष देण्यापूर्वी तीर्थाटनाच्या आमिषाने अवघा आर्यावर्त फिरून पहावा; म्हणून अनेक ऋषिमुनी, काही जाणकार, आपले बंधू, थोडा लवाजमा घेऊन श्रीरामाने साधारणपणे वर्ष-सवा वर्ष भारतभ्रमण केले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, ऋषींचे आश्रम पाहिले, अनेक राजधान्या पाहिल्या. या प्रवासात त्यांना सर्वत्र रावणाच्या जबरदस्त दहशतीचा पगडा जनमानसावर दिसला. राजा दशरथ हे चक्रवर्ती राजे होते. अन्य साधारणपणे तीन-साडेतीनशे राजे त्यांचे मांडलिक होते. अगदी राजा दशरथापासून तर इतर सर्व राजे, राक्षसांच्या आक्रमणाच्या भीतीच्या सावटाखाली होते. कुणातही रावणी दहशतीचा बीमोड करण्याची धमक नव्हती. सारेच मनाने पराभूत होते. सारा भारतखंड आक्रमणाच्या दडपणाच्या सावलीत भयभीत जीवन जगत होता आणि धर्म अनाथ झाला होता. हे सारे दृश्य श्रीरामाचे अंतःकरण विचलित करणारे ठरले. हे पाहून राम उद्विग्न/उदास झाला. त्याचे औदासिन्य सद्गुरु वसिष्ठांच्या उपदेशाने दूर झाले. ‘करिष्ये वचनं तव’ (मी तुमच्या म्हणण्यानुसार वागीन.’) असे अभिवचन त्याने महर्षि वसिष्ठ आणि विश्वामित्र यांना दिले.
५. राक्षसांशी केलेले युद्ध !
महर्षी वाल्मिकी म्हणतात की, श्रीरामात या प्रसंगानंतर परिवर्तन झाले. अंतरात उत्साहाचा सूर्य उगवला. जणू संदेहरहित, आत्मविश्वाससंपन्न, विजिगीषु रामाचा उदय झाला. विश्वामित्र ऋषींसह श्रीराम-लक्ष्मण त्यांच्या यज्ञ रक्षणासाठी सहर्ष निघाले. यज्ञाचे रक्षण याचाच अर्थ राक्षसांशी युद्ध ! राक्षसांच्या विध्वंसक कारवायांचा प्रत्यक्ष प्रतीकार आणि धर्मकार्यही ! तरुण श्रीरामाच्या जीवनातील हा क्रांतीकारक क्षण ठरला.
६. श्रीरामाचे वर्तन म्हणजे धर्मस्थापनेची नांदी !
विश्वामित्र ऋषींनी विशिष्ट हेतूने दोन्ही भावंडांना शिक्षण दिले. अगदी टीपकागदाप्रमाणे श्रीरामाने ते टिपून घेतले. त्या काळात श्रीराम वनवासी, भिल्ल, आदिवासी, गिध-वानर-भालू अशा निम्न प्रजातींशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करत असे. जणू भविष्यातील धर्मस्थापनेची ही नांदीच होती; म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, ‘धर्मसंस्थापक जय जय राम ।’
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
– श्रीमती स्नेहल पाशुपत, बेंगळुरू (साभार : ‘श्रीरामनामावली’ या पुस्तकातून)