धर्माचरणाचे लाभ
‘मला लहानपणापासून कोणतेही अलंकार किंवा फुले, गजरे असे काहीही घालण्यास आवडत नव्हते. मला धर्माचरणातील कोणतीही गोष्ट करायला जमत नसे. याचे कारण मला माझे आश्रम जीवन चालू झाल्यावर, तसेच ‘अलंकारशास्त्र’ हा ग्रंथ वाचल्यावर लक्षात आले.
१. धर्माचरणाच्या कृतींतून ग्रहण होणारे चैतन्य सहन न झाल्याने विविध त्रास होणे
मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे अलंकारातून ग्रहण होणारे चैतन्य मला सहन होत नव्हते. मला त्याचा त्रास होतो. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. मी कधीही टिकली किंवा गंध लावू शकत नव्हते. ते लावल्यावर मला पुरळ येत असे.
आ. माझे नाक ३ वेळा टोचले; परंतु नाकात अलंकार घातल्यावर मला शिंका, सर्दी, नाकातून पाणी येणे, असे त्रास होत असत.
इ. गजरा किंवा फुले घातल्यावर मला मळमळण्याचा तीव्र त्रास होत असे.
ई. कानातले (कानातील अलंकार) घातल्यावर मला कानाला खूप खाज येत असे.
उ. बांगड्या आणि पैंजण घातल्यावर मला पुष्कळ अस्वस्थ वाटत असे आणि बांगड्या वाढवण्याचे अन् पैंजण तुटण्याचे प्रमाणही अधिक होते.
ऊ. मला मोकळे केस ठेवायला आवडत असत. मला केस बांधायला, तसेच केसांना तेल लावायलाही आवडत नसे. त्यातही केसांचा मध्यभागी भांग पाडणे, अंबाडा घालणे मला अगदीच असह्य होत असे. भांग पाडून अंबाडा बांधल्यावर मला तीव्र डोकेदुखी, मळमळणे, असे त्रास होत असत.
ए. मला घट्ट कपडे घालणेच जमत असे आणि त्यामुळे आवडतही असे. सैलसर कपडे घातल्यावर मला अस्वस्थता येत असे.
२. धर्माचरणामुळे विविध कृतींद्वारे चैतन्य ग्रहण करता येऊ लागणे आणि त्याचा साधनेच्या दृष्टीने लाभही होणे
साधनेला प्रारंभ केल्यानंतर आणि मुख्यत: आश्रमजीवन चालू झाल्यावर मी हळूहळू एक-एक अलंकार घालण्याचे आणि धर्माचरणाचे प्रयत्न चालू केले. आरंभी मला या सर्वांचा पुष्कळ त्रास झाला; परंतु आता मला अलंकार धारण करणे, तसेच धर्माचरणातील कृती करणे, इत्यादींद्वारे चैतन्य ग्रहण करता येत असून त्याचा साधनेच्या दृष्टीने लाभही करून घेता येत आहे.
३. कृतज्ञता
या सर्वांमधून माझ्या लक्षात आले, ‘हिंदु धर्म पुष्कळ महान असून त्यातील धर्माचरणाच्या लहानलहान कृतींमधून आपल्याला ईश्वराशी जोडले आहे. त्याचसमवेत आध्यात्मिक त्रासाचा आपल्या सामान्य कृतींवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.’ प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) केलेले अमूल्य संशोधन आणि अभ्यास यांमुळे ही सूत्रे माझ्या लक्षात आली. त्यामुळे मला होत असलेल्या त्रासावर मात करण्यासाठी प्रयत्न करता आले. यासाठी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |