स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना रामनाथी आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्‍याकडून सौ. शुभांगी पाटणे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘रामनाथी आश्रमात स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेत ठिकठिकाणचे साधक सहभागी झाले होते. त्‍यांनी ‘प्रक्रिया कशी राबवायची ?’ याविषयी जाणून घेतले. यामध्‍ये सौ. सुप्रिया माथूर यांनी साधकांना अनेक प्रसंगांमधून ‘मूळ स्‍वभावदोष ओळखणे आणि त्‍यावर योग्‍य प्रक्रिया करून तो नष्‍ट करणे’, हे सांगून ही प्रक्रिया राबवून घेतली. यात सारणी लिखाण करणे, मनाचा आढावा घेणे, फलकावर चुका लिहिणे आदी कृती अंतर्भूत असतात. सांगोला, जिल्‍हा सोलापूर येथील सौ. शुभांगी पाटणे यांना ही प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. सुप्रिया माथूर

१. साधनेच्‍या प्रयत्नांमधील पहिला टप्‍पा

साधनेच्‍या प्रयत्नांमधील प्राथमिक टप्‍पा म्‍हणजे ‘साधनेचे प्रयत्न चिंतनसारणीनुसार करणे’, हा आहे. स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना चिंतनसारणीनुसार प्रयत्न करणे अत्‍यंत महत्त्वाचे असते. स्‍वभावदोष आणि अहं यांचे अनेक पैलू समजून घेऊन त्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्न करायला हवेत.

सौ. शुभांगी पाटणे

२. सारणी लिखाण करतांना लक्षात घ्‍यावयाची सूत्रे

अ. सारणी लिखाणामध्‍ये ‘स्‍वभावदोष आणि सूचना लिहितो, त्‍या योग्‍य आहेत का ? आणि आपण चुका मनापासून लिहितो का ?’, यांचे चिंतन करायला हवे.

आ. सारणी लिखाणात सूचना देतांना ‘मी परिस्‍थिती स्‍वीकारीन, निरपेक्ष राहीन, अंतर्मुख राहीन’, असे शब्‍द लिहितो; पण ‘परिस्‍थिती स्‍वीकारणार म्‍हणजे नेमके काय स्‍वीकारणार ?’, असा अभ्‍यास करायला हवा.

इ. पुष्‍कळ वेळा सारणीमध्‍ये स्‍वभावदोष लिहितांना ‘विसराळूपणा’ असे लिहितो; पण ‘एखादे सूत्र किंवा कृती विसरण्‍यामागे मनाची स्‍थिती कशी असते ? एकाग्रता होती का ? मनात कोणते विचार होते ? सूत्र लिहून ठेवले होते का ? लिहून ठेवलेले सूत्र वाचले होते का ?’, असा अभ्‍यास करायला हवा.

ई. आढाव्‍यात सांगायचे म्‍हणून सारणी लिखाण आणि इतर व्‍यष्‍टीचे प्रयत्न करत असू, तर साधना म्‍हणून काहीच लाभ होणार नाही; कारण आढावा नसेल, तर आपण साधनेचे प्रयत्न करण्‍याचे टाळतो. या प्रयत्नांमध्‍ये सातत्‍य हवे.

उ. जेवणे, झोपणे, पाणी पिणे जसे सहज होते, तसे लिखाण आणि चिंतन सहज व्‍हायला हवे, म्‍हणजे ते आत्‍मसात् करणे सोपे जाते.

ऊ. सारणी लिखाण करतांना सूचनेेमध्‍ये ‘दृष्‍टीकोनासह कृतीच्‍या स्‍तरावर काय प्रयत्न करणार ?’, हे लिहायला हवे; कारण २ टक्‍के सूचनेला आणि ९८ टक्‍के कृतीला महत्त्व आहे.

ए. सारणीमध्‍ये मनातील अयोग्‍य विचारावर योग्‍य विचार लिहिण्‍याने मनोदेह, कारणदेह आणि चित्तवृत्ती यांची शुद्धी होते.

ऐेे. सारणीमध्‍ये सूचना लिहितांना भावाच्‍या स्‍तरावरील दृष्‍टीकोन लिहिण्‍यापेक्षा ‘वस्‍तुस्‍थिती आणि कृतीच्‍या स्‍तरावर काय करू शकतो ?’, हे लिहायला हवे.

३. मनाचा आढावा

अ. प्रत्‍येक घंट्याला मनाचा आढावा घेतांना ‘मनाची प्रक्रिया कशी चालू आहे ? मन कुठल्‍या विचारात ठाम रहाते ? ते कुठे ऐकण्‍याच्‍या स्‍थितीत नसते ? स्‍वीकारतांना मनाचा संघर्ष कुठे कुठे होतो ?’, हे पहायला हवे.

आ. मनातील पुष्‍कळ लहान लहान विचार आपल्‍याला पकडता यायला हवेत. त्‍यामुळे स्‍वभावदोष आणि अहं यांची तीव्रता लक्षात येते.

इ. मन धावते त्‍याप्रमाणे धावले, तर मनावर संयम रहाणार नाही.

ई. आपले मन सतत ‘माझ्‍या मनाविरुद्ध कसे होते ?’, हे शोधत असेल, तर मन निरुत्‍साही आणि अलिप्‍त बनते.

उ. प्रत्‍येक प्रसंगात ‘असे नाही, असे असायला हवे’, असा विचार येणे, म्‍हणजे ‘स्‍वतःला अधिक कळते’, असे असते. अशा विचारांमुळे देवाशी अनुसंधान ठेवू शकत नाही; कारण हे विचार निरर्थक नसतात, तर अहंचे असतात.

४. समष्‍टीत स्‍वत:च्‍या चुका सांगणे

अ. समष्‍टीत चुका सांगतांना ‘मनाला काय जाणवते ?’, ते पहायला हवे.

आ. एखाद्या साधकाला अनेक वेळा चुका सांगूनही तो परत त्‍याच त्‍याच चुका करत असेल, तर ‘आपण कृतीच्‍या स्‍तरावर काय करू शकतो ?’, हे पहायला हवे.

इ. मनातील अयोग्‍य विचार फलकावर लिहिणे आणि ते सांगून क्षमायाचना करणे यांनीच आपली प्रतिमा नष्‍ट व्‍हायला साहाय्‍य होते.

ई. मनामध्‍ये आग्रही भूमिका असेल, तर ती कृती उतावळेपणाच्‍या स्‍वरूपात होते.

५. विचारण्‍याची वृत्ती

एखादे सूत्र विचारून न घेण्‍यामागे अनेक पैलू असतात, उदा. महत्त्व न वाटणे, न्‍यूनपणा (कमीपणा) न घेणे, प्रतिमा जपणे, ऐकण्‍याची आणि स्‍वीकारण्‍याची वृत्ती नसणे इत्‍यादी. स्‍वतःचा विचार अधिक असल्‍यास समजण्‍याचा, ऐकण्‍याचा आणि स्‍वीकारण्‍याचा विचार होत नाही.

६. अन्‍य सूत्रे

अ. एखादा साधक एखाद्या सूत्राविषयी आठवण करून देतो. तेव्‍हा ‘तो कशा पद्धतीने बोलतो ?’, हे पहाण्‍यापेक्षा ‘मला आठवण करून देतो’; म्‍हणून कृतज्ञता वाटायला हवी.

आ. निरपेक्षता ही स्‍थिती आहे. ‘समजूतदारपणा आणि परिस्‍थिती स्‍वीकारणे’ वाढले की, निरपेक्षपणा निर्माण होतो.

इ. इतरांचे स्‍वभावदोष बघणे, हेे परनिंदेसमान आहे.

ई. आपण बोलतांना म्‍हणतो ‘सहज बोललो’; पण तो अविचार आहे. ‘या बोलण्‍याचा दुसर्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे पहायला हवे.

उ. ‘मी साधनेच्‍या दृष्‍टीने काय करायला हवे ?’, असा विचार करणे म्‍हणजे अंतर्मुखता आणि ‘इतरांनी साधना म्‍हणून काय करायला हवे ?’, हे सतत पहाणे म्‍हणजे बहिर्मुुखता आहे.

ऊ. स्‍वतःच्‍या प्रगतीचा आढावा घेतांना ‘स्‍वभावदोषांची तीव्रता किती होती आणि आता त्‍याची तीव्रता किती न्‍यून झाली आहे ?’ असा अभ्‍यास केल्‍यानेच मन सकारात्‍मक रहाते.’

– सौ. शुभांगी पाटणे, सांगोला, सोलापूर. (१.११.२०२०)