दमोह (मध्यप्रदेश) येथील खासगी शाळेत हिंदु मुलींनी परिधान केला हिजाबसारखा गणवेश !

सरकारकडून चौकशीचा आदेश !

हिजाब (मुसलमान महिलेने डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

दमोह (मध्यप्रदेश) – दमोह जिल्ह्यातील ‘गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालय’ या खासगी शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाबसारखा गणवेश परिधान केलेला आढळून आला. या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारने चौकशीचा आदेश दिला आहे.

१. गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु विद्यार्थिनींनी हिजाबसारखे दिसणारे कपडे परिधान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणाची प्रथम जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशी केली होती. यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांना याची सखोल चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

२. या प्रकरणी हिंदु संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शाळेची नोंदणी रहित करण्याची मागणी केली. ‘शाळेकडून हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडले जात आहे’, असा आरोप या संघटनांनी केला.

३. दमोहचे जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, यापूर्वी केलेल्या तपासणीत धर्मांतराचा दावा खोटा असल्याचे आढळून आले होते. गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक सिद्ध करण्यात येत आहे.

४. पोलीस अधीक्षक राकेश कुमार सिंह यांनी म्हटले की, आतापर्यंत पालक किंवा विद्यार्थिनी यांच्यापैकी कुणीही याविषयी तक्रार केलेली नाही.

५. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, या घटनेची नोंद घेतली गेली असून आवश्यक कारवाईसाठी दमोहचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या जात आहेत.

‘स्कार्फ’ला हिजाब समजले जात आहे ! – शाळेचे संचालक मुस्ताक खान यांचा दावा

(‘स्कार्फ’ म्हणजे एक प्रकारचे रूमालासारखे मोठे कापड, जे डोक्याला बांधता येते)

गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालयाचे संचालक मुस्ताक खान यांनी दावा केला की, शाळेच्या गणवेशामध्ये ‘स्कार्फ’चा समावेश आहे; मात्र तो घालण्यासाठी कुणालाही बाध्य केले जात नाही. याच स्कार्फला हिजाब समजले जात आहे.

संपादकीय भूमिका

देशातील बहुसंख्य शाळांच्या गणवेशामध्ये विद्यार्थिनींसाठी स्कार्फ घालण्यात येत नाही; मात्र या शाळेत थेट हिजाब घालण्यास विरोध होईल; म्हणून स्कार्फ घालण्यास बाध्य केले जात आहे का ? याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे !