गोवा : पीडितेला तक्रार नोंद होण्यापूर्वी लांच्छनास्पद घटनेची ७ वेळा विविध ठिकाणी माहिती द्यावी लागली !

न्यायव्यवस्थेने पोलिसांच्या हलगर्जीपणाची घेतली नोंद !

पणजी, २८ मे (वार्ता.) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अन्वेषणात गोवा पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणाची न्यायसंस्थेने नोंद घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांचा हलगर्जीपणा आणि प्रकरणाला अनुसरून उद्भवलेला वाद याचे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शरीन पॉल यांच्या नेतृत्वाखाली अन्वेषण केले जात आहे. न्यायालयाने साक्षीदारांना साक्ष देण्यासाठी बोलावले आहे. या अन्वेषणाच्या वेळी पीडितेला तक्रार नोंद होण्यापूर्वी लांच्छनास्पद घटनेची ७ वेळा विविध ठिकाणी माहिती द्यावी लागल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पीडित अल्पवयीन युवतीवर तब्बल ७ मास तिच्याच वडिलांनी अनेक वेळा बलात्कार केला आणि पीडित युवतीला ४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. यानंतर पीडित युवतीने धाडस दाखवून प्रथम तिची मैत्रीण, शिक्षिका, विद्यालयातील समुपदेशक, अशासकीय संस्था, महिला पोलीस, आगशी पोलीस आणि शेवटी जुने गोवे पोलीस यांना तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली; मात्र तरीही संशयित वडिलांच्या विरोधात तक्रार नोंद झाली नाही. शेवटी बाल कल्याण समितीने यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतरच संशयिताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर निष्काळजीपणाचा आरोप झाल्यानंतर महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांचे पोलीस मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले, तसेच या प्रकरणी पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता आणि या प्रकरणाशी निगडित अन्य पोलीस कर्मचारी यांचे महिला पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून समांतर अन्वेषण चालू करण्यात आले. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार बाल कल्याण समितीने पीडितेला न्याय मिळण्यासाठी संबंधित सर्व घटकांशी संपर्क साधला आहे. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा इस्टर टॉरीस यांनी अन्वेषण यंत्रणांकडे प्राधान्याने या प्रकरणाचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

तक्रारदार पीडितेलाच त्रास देणार्‍या अशा पोलिसांवर कठोर कारवाई झाल्यासच पोलीस खात्यातील असे प्रकार थांबतील !