गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानी दोन्ही राज्यांतील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (डावीकडून तिसरे) आणि गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे (उजवीकडून दुसरे)

पणजी, २४ मे (वार्ता.) – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याशी केलेल्या पर्यटनविषयक सामंजस्य कराराद्वारे उत्तर काशी आणि दक्षिण काशी एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या पुढाकारातून हे साकार झाले, असे  उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानी दोन्ही राज्यांतील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे. २३ मे या दिवशी गोवा ते डेहराडून थेट विमानसेवा चालू झाली असून ‘इंडिगो’ आस्थापनाच्या पहिल्या विमानाने १५० प्रवाशांना घेऊन गोव्यातील मोपा विमानतळावरून डेहराडूनकडे उड्डाण केले होते.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हरिद्वार येथे योगऋषी रामदेवबाबा आणि ‘पतंजलि’चे आचार्य बाळकृष्ण यांची घेतली भेट

योगऋषी रामदेवबाबा यांच्याशी चर्चा करतांना पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, २४ मे (वार्ता.) – राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हरिद्वार येथे योगऋषी रामदेवबाबा आणि ‘पतंजलि’चे आचार्य बाळकृष्ण यांची हरिद्वार येथे भेट घेतली.

गोव्यात योगाचा प्रसार करण्यासंदर्भात योगऋषी रामदेवबाबा आणि मंत्री खंवटे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. योगऋषी रामदेवबाबा यांनी गोव्यातील छोट्या हॉटेल्समध्ये योगासनवर्ग, तसेच तारांकित हॉटेल्समध्ये योग आणि शारीरिक स्वास्थ्य यांच्या संदर्भात वर्ग चालू करण्याची सूचना केली. राज्यात योगाचा प्रसार करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

गोवा आणि उत्तराखंड राज्यांमध्ये पर्यटनवृद्धीसाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराविषयी ते म्हणाले, ‘‘गोव्याचे समुद्रकिनारे आणि गंगा नदी यांचा हा वेगळा संगम पर्यटकांना वेगळा अनुभव देईल. गोवा आणि हिमालय संस्कृती यांच्यातील संगम पर्यटकांना दैवी अनुभव देईल.’’

आचार्य बाळकृष्ण भेटीत म्हणाले, ‘‘गोव्याला योगभूमी आणि आध्यात्मिक केंद्र बनवण्यासाठी गोवा शासनासह काम करायला मला आवडेल. गोवा आणि उत्तराखंड राज्यांत चालू झालेल्या थेट विमानसेवेमुळे दोन्ही राज्यांतील लोकांना अल्प वेळेत चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.’’