दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती !

खाडीमुखावरील वाळूचा पट्टा हालवण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी संमत

दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती

गुहागर – दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती देण्यात आली आहे. दाभोळ खाडीच्या मुखावर असलेला वाळूचा पट्टा (गोद) हालवण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. याविषयी निर्णय केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोणोवाल यांच्या मंत्रालयाने घेतला आहे. या संदर्भातील पत्र तालुक्यातील वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठल भालेकर यांना मिळाले आहे. मागील ६ वर्षे  विठ्ठल भालेकर हा वाळूचा पट्टा हालवण्यासाठी पाठपुरावा करत होते.

मंत्री सोणोवाल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम २०१६ द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग २८ म्हणून ओळखले जाईल.

२. राष्ट्रीय जलमार्ग १० आणि २८ यांच्या विकासासाठी १० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.

३. या योजनेला अंतिम रूप मिळाल्यानंतर या निधीतून प्राधिकरणाच्या मानकांनुसार दाभोळ खाडीच्या मुखावर ‘ड्रेजिंग’ करण्यात येईल. त्यामुळे १२ मास दाभोळ खाडीतून समुद्रात छोट्या-मोठ्या जहाजांची वाहतूक सुरुळीत होईल.

४. सात एप्रिल या दिवशी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल गुहागरच्या दौर्‍यावर आले होते आणि केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री परशोत्तम रूपाला सागर परिक्रमासाठी १८ मे या दिवशी वेलदूरला आले होते. त्या वेळीही श्री. विठ्ठल भालेकर यांनी याविषयीचे निवेदन दोन्ही मंत्र्यांना दिले होते.