मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

गोव्याची ‘परशुराम भूमी’ ही ओळख पुनर्स्थापित करण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील !

गोवा ही ‘परशुरामभूमी’

पणजी, २३ मे (वार्ता.) – भगवान परशुरामाने अरबी समुद्रात बाण मारून गोमंतकाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे आणि यामुळे गोवा ही ‘परशुरामभूमी’ म्हणून प्रचलित आहे; मात्र सध्या गोव्याची प्रतिमा ‘पार्टी करण्याचे ठिकाण’, अशी निर्माण झालेली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘गोव्याचा वारसा आणि आध्यात्मिक महत्त्व पुनर्स्थापित केल्यास गोव्याची प्रतिमा पालटू शकते. यामुळे गोवा सरकार भगवान परशुराम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार आहे.’’

पर्यटनमंत्री रोहन खंवटे पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात काणकोण येथे श्री परशुराम मंदिर सोडल्यास अन्य कुठेही भगवान परशुराम यांच्याशी निगडित वास्तू नाही. यामुळे आम्ही भगवान परशुराम यांचे प्रतीक असलेले ‘धनुष्य आणि बाण’ यांची प्रतिकृती उभारणार आहोत. ही प्रतिकृती मांद्रे, पेडणे येथे उभारली जाणार आहे. पर्यटन खात्याच्या समितीने या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. नैसर्गिक दगडावर ‘धनुष्य आणि बाण’ यांची प्रतिकृती उभारली जाणार आहे. हरमल, पेडणे येथे ‘यज्ञकुंड’ हे पवित्र ठिकाण आहे आणि यामुळेच मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनीच ‘धनुष्य आणि बाण’ उभारण्याची संकल्पना शासनासमोर मांडली.’’


हे ही वाचा –

गोवा ही परशुरामभूमीच !
https://www.sanatan.org/mr/a/86173.html