उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तळेगाव येथे ‘ठिय्या’ आंदोलन !

किशोर आवारे हत्या प्रकरण

किशोर आवारे

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आवारे कुटुंबीय, नातेवाइक आणि कार्यकर्त्यांनी १७ मे या दिवशी काढणार असलेल्या मोर्च्यास पोलिसांनी अनुमती दिली नाही. तेव्हा आक्रमक जमावाने रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांना निवेदन दिले. आंदोलक मारुति मंदिर चौकातून सायंकाळी ५ वाजता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याकडे निघाले होते. तेव्हा पोलिसांनी भंडारी रुग्णालयासमोर आंदोलकांना अडवले. ‘इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास अटक करा’, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, साहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट हे अन्वेषण चालू असल्याचे सांगत आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा किशोर यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी त्यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.