‘गृहरचना संस्‍थे’च्‍या आवारात भटक्‍या श्‍वानांच्‍या पुनर्वसनाच्‍या उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील वडगाव शेरीतील ‘ब्रह्मा सनसिटी सहकारी गृहरचना संस्‍थे’च्‍या आवारात ७ वर्षांच्‍या मुलावर भटक्‍या कुत्र्यांनी आक्रमण केल्‍यानंतर महापालिकेने तेथील ६० कुत्र्यांना पकडून सुरक्षित निवार्‍यात ठेवले होते. त्‍यानंतर एका प्राणीप्रेमी कार्यकर्त्‍याने मुंबई उच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका प्रविष्‍ट करून ‘भटक्‍या कुत्र्यांचे संस्‍थेच्‍या आवारातच पुनर्वसन करावे’, अशी मागणी केली होती. ती मागणी न्‍यायालयाने मान्‍य केली; मात्र या निकालाच्‍या विरोधात संस्‍थेने अधिवक्‍ता सत्‍या मुळे यांच्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्‍यावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला स्‍थगिती दिली आहे.

संस्‍थेच्‍या विशेष याचिकेवर १५ मे या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. न्‍यायमूर्ती जे.के. माहेश्‍वरी आणि न्‍यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्‍या खंडपिठाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या कार्यवाहीला स्‍थगिती दिली आहे. ज्‍येष्‍ठ विधीज्ञ देवदत्त कामत, अधिवक्‍ता वैभव कुलकर्णी आदींनी सहकारी गृहरचना संस्‍थेच्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात बाजू मांडली.