केरळ राज्यातील हिंदु युवतींचा बुद्धीभेद करून त्यांच्याशी विवाह करायचा, त्यांचे धर्मांतर करायचे आणि मुसलमान झालेल्या अशा युवतींना आतंकवादी कारवायांसाठी प्रवृत्त करायचे, हे पडद्यावर मांडणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अशीच वस्तूस्थिती असलेली भयंकर सत्य घटना मध्यप्रदेशात उजेडात आली आहे. मध्यप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने आतंकवादी संघटना ‘हिज्ब-उत्-तहरीर’ (हुट) च्या १६ सदस्यांना आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. यातील १६ पैकी ८ सदस्य हे मूळचे हिंदु होते. त्यांचा बुद्धीभेद करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले होते. यांचा बुद्धीभेद इतक्या स्तरांपर्यंत करण्यात आला होता की, त्यांनी अन्य हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांनाही मुसलमान बनवले.
‘हिज्ब-उत्-तहरीर’ म्हणजेच ‘तहरीक-ए-खिलाफत’ या कट्टरतावादी इस्लामी संघटनेचे कार्य ५० देशांमध्ये असून १६ देशांनी तिच्यावर याआधीच बंदी घातली आहे, अशीही माहिती समोर आली आहे. यावरून धर्मांतर आणि आतंकवादाचे प्रचंड मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच समोर आले आहे.
आतंकवाद्यांविषयी गंभीर माहिती
या सर्व पकडलेल्या आतंकवाद्यांकडून अन्वेषणाच्या कालावधीत गंभीर माहिती समोर आली आहे. हे प्रकरण केवळ मध्यप्रदेशपुरते मर्यादित न रहाता त्याची व्याप्ती अन्य राज्यांतही असल्याचे अन्वेषणात पुढे आले आहे. पकडण्यात आलेला एक प्राध्यापक महंमद सलीम हा ‘एम्.आय.एम्.’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भाग्यनगर येथील मालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होता. या आतंकवाद्यांकडून तांत्रिक उपकरणांसह देशविरोधी साहित्य आणि शस्त्रास्त्रेही सापडली आहेत.
हे आतंकवादी समाजात संगणक अभियंता, शिक्षक, व्यावसायिक, व्यायाम प्रशिक्षक, व्यायाम प्रशिक्षण केंद्राचे संचालक, रिक्शाचालक, शिंपी आदींच्या रूपात कार्यरत होते. या सर्वांना जंगलामध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही गुप्त रूपाने देण्यात आले होते. यातील काही आतंकवाद्यांकडे आंतरराष्ट्रीय क्रमांक मिळाले, ज्यात काही पाकिस्तानी क्रमांक आहेत.
या आतंकवाद्यांमधील सय्यद रिझवी हा आतंकवादी शिकवणी वर्ग घेत असल्याचे समोर आले आहे. जो व्यक्ती एखाद्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे आणि अन्य जो व्यक्ती विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गात शिकवतो ?, त्यावरून ते विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ? किंवा त्यांच्याकडून किती विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद झाला असेल, याचा विचारच न केलेला बरा !
झाकीर नाईकचा सहभाग !
भारतातून पळून गेलेला आणि आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याच्यापर्यंत या प्रकरणातील धागेदोरे पोचले आहेत. झाकीर नाईक हा ‘इस्लाम धर्म कसा चांगला आहे’, हे सांगत असतो आणि ‘मुसलमानांनी आतंकवादी बनावे’, असे उघड उघड आवाहन करत असतो. बांगलादेशातील एका आतंकवादी आक्रमणातील आरोपीने त्याला हे कृत्य करण्यासाठी झाकीर नाईकच्या व्याख्यानातून ‘प्रेरणा’ मिळाल्याचे सांगितले. त्याच प्रकारे आताच्या प्रकरणात पकडलेल्या हिंदु युवकाच्या आई-वडिलांनी ‘त्यांच्या मुलाने झाकीर नाईकची व्याख्याने ऐकून कशा प्रकारे मुसलमान धर्म स्वीकारला’, हे सांगितले. हा युवक स्वत: मुसलमान तर बनलाच; पण पुढे जाऊन त्याने त्याच्या पत्नीला मुसलमान बनवले आणि प्रतिदिन आई-वडिलांनाही ‘मुसलमान झाल्याखेरीज तुम्हालाही जन्नत मिळणार नाही’, असे सांगून त्यांनाही मुसलमान होण्यासाठी प्रवृत्त करत असे.
यावरून झाकीर नाईक याचे भारतात अजूनही किती मोठ्या प्रमाणात ‘रॅकेट’ कार्यरत आहे आणि तो देशातील युवकांचे बुद्धीभेद करून धर्मांतर करत आहे, ते समोर येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार झाकीर नाईकच्या मुसक्या आवळणे किती अत्यावश्यक आहे, ते लक्षात येईल.
कठोर कायदा आणि कठोर कारवाई अपेक्षित !
धर्मांतराच्या सूत्रावरून सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘बळजोरीने होणारे धर्मांतर हे गंभीर सूत्र आहे. जे राष्ट्राची सुरक्षा आणि धर्माचे स्वातंत्र्य यांना प्रभावित करते. अशा प्रकारे होणार्या धर्मांतराच्या विरोधात तात्काळ पावले उचलली पाहिजेत’, असेही मत व्यक्त केले आहे. धर्मांतर झालेली व्यक्ती ही पुढे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करते, तसेच अन्य धर्मियांचा कोणताही विचार न करता पहाटे ५ वाजता कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपकावरून अजान देणे, मशिदीच्या समोरून धार्मिक मिरवणूक नेल्यास दंगा करणे असे करून धर्मांधता सतत प्रकट करते, जे समाजासाठी घातक आहे.
या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘हे सूत्र आम्ही गंभीरतेने घेतले असून लव्ह जिहाद, धर्मांतर आणि धर्मांतरातून असंतोष निर्माण करणे याविरोधात आम्ही कठोर कारवाई करू’, असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले. देशातील ८ राज्यांमध्ये आज हिंदु अल्पसंख्यांक झालेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात १ लाखांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याचे ख्रिस्ती मिशनरी उघडपणे सांगत आहेत. त्यामुळे आंधप्रदेश, केरळ असो वा मध्यप्रदेश ही केवळ समोर आलेली प्रातिनिधिक उदाहरणे असून अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रीय स्तरावरील ‘धर्मांतरबंदी’चा कठोर कायदा आणि त्याची सातत्याने कठोर प्रभावी कार्यवाही अत्यावश्यक आहे !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक ! |