मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वन खात्याकडे सविस्तर अहवाल मागितला
पणजी, १५ मे (वार्ता.) – हल्लीच वनक्षेत्रांना लागलेली आग ही नैसर्गिक कि मानवनिर्मित होती ? याचे अन्वेषण करून सविस्तर अहवाल देण्याचा आदेश वन खात्याला दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत.
(सौजन्य : Prudent Media Goa)
वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या. वनखात्यानुसार ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी आग लगेच विझवण्यात आली; मात्र डोंगराळ प्रदेशात वायूदलाच्या साहाय्याने आग विझवण्यात आली. वनक्षेत्रांमध्ये आग सर्वत्र पसरू नये, यासाठी ‘फायर लाईन’ सिद्ध करून त्याची देखभाल करणे, आग लागल्यास त्याविषयी माहिती देण्यासाठी व्यक्तींची नेमणूक करणे, वनक्षेत्रात पाण्याचा साठा उपलब्ध करणे, वनक्षेत्रातील पायाभूत सुविधा भक्कम करणे, आग विझवण्यासाठीची उपकरणे उपलब्ध करणे, आग लागण्याच्या संभाव्य ठिकाणी माती आणि आर्द्रता यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे, आगीसंबंधी संबंधितांमध्ये जागृती करणे, वनक्षेत्राला आगीपासून वाचवण्यासाठी वनक्षेत्रात रहाणार्यांमध्ये जागृती करणे आदी उपाययोजना वन खात्याने वनक्षेत्रांतील आग दुर्घटना टाळण्यासाठी करण्याचे ठरवले आहे.