|
सावंतवाडी – शहरातील माठेवाडा येथे शिवभक्त श्री दामोदर भारती महाराज यांनी आध्यात्मिक सामर्थ्याने निर्माण केलेल्या जलकुंडाच्या (आत्मेश्वर तळीच्या) पाण्याची पातळी प्रतिवर्षीपेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ‘नेहमी दुथडी भरून वहाणार्या या तळीच्या पाण्याची पातळी एवढी का घटली ?’ याचे संशोधन भूजल शास्त्रज्ञ, अध्यात्मशास्त्र यांतील उन्नत आणि अभ्यासक यांच्याकडून केले जावे, अशी मागणी येथील भाविकांनी केली आहे.
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथे असलेल्या श्री देव आत्मेश्वर मंदिराच्या समोर ही ‘आत्मेश्वर तळी’ आहे. शिवभक्त श्री दामोदर भारती महाराज येथील खडकावर बसून साधना करत असत. त्यांनी साधनेच्या बळावर येथील खडकावर त्रिशूळ मारून या पवित्र जलकुंडाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. हे पाणी गंगेसमान असून या तिर्थाचा त्वचेच्या आजारांवर उपाय म्हणून वापर करतात. या कुंडाच्या सभोवती खडकावर अनुमाने १० फूट उंचीचे चारही बाजूने बांधकाम केले आहे. पावसाळ्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत ही तळी १० फूट उंचीच्या भिंतीवरूनही दुथडी भरून वहात असते. महाशिवरात्रीनंतर कालपरत्वे पाणी थोडे थोडे न्यून होते. मे मासाच्या अखेरीस मुख्य कुंडाच्या वर ५ फूट पाणी असते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक दोरी अन् कळशी यांच्या साहाय्याने पाणी काढत असत. प्रतिवर्षी किमान ५ फुटांपर्यंत असणारी पाण्याची पातळी या वर्षी मुख्य कुंडापर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे आता कळशीने पाणी काढणेही कठीण झाले आहे.
सावंतवाडीचे श्री भवानी शंकर आत्मेश्वर मंदीर आणि तीर्थक्षेत्र आत्मेश्वर जलकुंड
(सौजन्य : Ekta Jiv Sadashiv)
कुंडाची पातळी प्रथमत:च एवढी घटल्याचे पुरोहित गणेश पेंढारकर यांनी सांगणे
श्री देव आत्मेश्वर मंदिराची स्थापना झाल्यापासून तेथे पूजा-आर्चा करणारे येथील पेंढारकर घराण्यातील सातव्या पिढीतील पुरोहित श्री. गणेश पेंढारकर याविषयी म्हणाले, ‘‘पाण्याची पातळी मुख्य कुंडापर्यंत खाली जाण्याची ही पहिलीच वेळ असून ही घटना अचंबित करणारी आहे.’’ या पाण्याचा प्रतिदिन वापर करणारे रहिवासी आणि भाविक यांना हा कलियुगाचा महिमा वाटतो, तर काहींना आपत्काळाचे संकेत वाटतात.
सावंतवाडी संस्थानच्या काळात या तळीस (कुंडास) राजाश्रय असल्याने तळीची देखभाल, दुरुस्ती आणि पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने आचारसंहितेचे काटेकोर पालन होत होते. सध्या ही तळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली आहे. या समितीचे उपकार्यालय श्री देव आत्मेश्वर मंदिर परिसरातील धर्मशाळेत आहे. कुंडापर्यंत पाण्याची पातळी न्यून होऊनही यावर उपाययोजना किंवा त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास या कार्यालयाकडून उदासीनता दाखवली जात आहे, अशी खंत स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.
तीर्थस्थळ घोषित झाल्यावर तळीचे सुशोभिकरण सावंतवाडी नगरपालिकेने केले होते. सद्य:स्थितीत सावंतवाडी नगरपरिषद तळीच्या आजूबाजूच्या भागाची स्वच्छता ठेवत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ‘आत्मेश्वर तळी’ हे पर्यटन तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अनेक पर्यटक या तीर्थस्थळाला भेट देत असतात. असे असूनही प्रशासनाने या समस्येची नोंद घेण्याचे सौजन्य दाखवले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.