फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी विशेष अतिथी !

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

नवी देहली – फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त, म्हणजे १४ जुलै २०२३ या दिवशी राजधानी पॅरिस येथे साजरा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. फ्रान्समध्ये प्रतिवर्ष १४ जुलैला ‘बॅस्टिल डे परेड’चे आयोजन केले जाते. या परेडमध्ये फ्रेंच सैन्यासह भारताच्या सशस्त्र दलाची तुकडी सहभागी होणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे निमंत्रण स्वीकारल्याविषयी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांचे छायाचित्र प्रसारित करत त्यांनी टि्वटरवर लिहिले, ‘१४ जुलैच्या संचलनासाठी पॅरिसमध्ये तुमचे स्वागत करतांना मला फार आनंद होईल.’ मॅक्रॉन यांच्या ट्वीटला उत्तर देतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘धन्यवाद मित्रा’ असे म्हटले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला  २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधानांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्‍यामुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन अन् महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्‍चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा आहे. १४ जुलै १७८९ या दिवशी फ्रान्समधील लोकांनी तेथील राजेशाहीशी संबंधित बॅस्टिलवर आक्रमण केले होते. यानंतर फ्रेंच राज्यक्रांती चालू झाली. ही घटना फ्रान्सच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. ही घटना फ्रान्स आपला ‘राष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरा करते.