गोवा येथे शांघाय सहकार्य परिषदेला प्रारंभ

  • भारताची चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

  • पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो परिषदेत सहभागी !

पणजी (गोवा) – गोव्यात शांघाय सहकार्य परिषदेला ४ मे या दिवशी प्रारंभ झाला. २ दिवसीय परिषदेत अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. दुसरीकडे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो या परिषदेत सहभागी होण्यासाठी ४ मे या दिवशी दुपारी पोचले. १२ वर्षांनंतर पाकचे परराष्ट्रमंत्री भारतात आले आहेत. त्यांच्याशी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर चर्चा करणार आहेत कि नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही देशांकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, त्यांना एकमेकांकडून चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही.

१. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे की, पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो शांघाय सहकार्य परिषदेमध्ये मित्रदेशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

२. जुलै मासामध्ये देहली येथे या परिषेदेतील देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. बिलावर भुट्टो या परिषदेला उपस्थित राहिल्याने त्या परिषदेला पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या वेळीही बिलावल भुट्टो उपस्थित रहाणार आहेत.