मुंबई – राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालू आहेत. या दृष्टीने दुर्गम भागांतील ज्या शाळांमध्ये ‘नेटवर्क’ नाही, अशा शाळांची शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दुर्गम भागांतील ज्या शाळांच्या ठिकाणी नेटवर्क नाही, त्या शाळा उपग्रहाने जोडाव्यात, अशी सूचना केसरकर यांनी शिक्षण विभागाला दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) नियामक मंडळाची सभा ३ मे या दिवशी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये पार पडली. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी दीपक केसरकर बोलत होते.
इंग्रजी शाळेतच शिकण्याचा अट्टाहास नको !भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धती प्राचीन आहे. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिकवलेला अभ्यास कायम लक्षात रहातो. त्यामुळे जे चांगले आहे, ते स्वीकारायला हवे. भारतीय शिक्षणपद्धती उपयुक्त आहे. भारतीय शिक्षणपद्धतीसह जगातील दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षणपद्धती अथवा अभ्यासक्रम यांचा अवश्य स्वीकार करावा; मात्र इंग्रजी शाळेतच शिकण्याचा अट्टाहास करू नये, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. |