पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
पुणे – आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कष्टांना उजाळा देतो. त्यामुळे त्यांच्या विचारांना पोचवण्याचे आपल्याकडून राहून जाते. त्यांच्याविषयी बोलतांना त्यांची राष्ट्रभक्ती, शैक्षणिक धोरण, संरक्षण धोरण अशा विविध वैचारिक सूत्रांवर बोलले पाहिजे. ‘राष्ट्रासाठी मरणे म्हणजे जगणे’, असा सावरकर यांचा विचार होता. चापेकर बंधू, सावरकर बंधू यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी स्वातंत्र्यलढ्यात बलीदान दिले. ही भारताच्या इतिहासातील अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, याविषयी समाजात बोलले पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, वक्ते योगेश सोमण यांनी केले. निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प योगेश सोमण यांनी गुंफले. या वेळी ते ‘आजच्या परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेतांना’ या विषयावर बोलत होते.
योगेश सोमण पुढे म्हणाले की, २ जन्मठेपेच्या शिक्षा भोगून आल्यानंतर पुण्यात सावरकरांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यांना ‘मृत्यूंजय’ असे संबोधन देण्यात आले. अभिनव भारताचे तत्त्वज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी त्यांनी मार्सेलिस येथे बोटीतून उडी मारली. सावरकरांविषयी सध्या काही लोक नकारार्थी बोलतात. सावरकरांनी क्षमा मागितली नसून दयेचा अर्ज केला होता. ते अर्जही फेटाळले असल्याचे त्यांनी त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकात लिहिले आहे. दयेचा अर्ज करणे हा त्यांचा न्यायिक अधिकार होता. सावरकर हे राष्ट्राचा विचार करणारे राजकीय नेते होते. राष्ट्रकार्य करणे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे यांसाठी बंदीवानातून सुटका करून घेणे, हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलतांना वैचारिकता जागृत ठेऊन तर्कशुद्धपणे बोलायला हवे.