लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत कारवाई
सोलापूर, ३० एप्रिल (वार्ता.) – विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे गोरक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तुळजापूर-लातूर मार्गे चारचाकी वाहनातून अनेक गोवंशियांची तस्करी करण्यात येत होती. संबंधित घटनेची माहिती औसा (जिल्हा लातूर) येथील पोलीस निरीक्षकांना दिली असता त्यांनी वाहन कह्यात घेतले. या वेळी वाहनातील गोवंशियांना दाटीवाटीने, क्रूरपणे कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी वाहन जप्त करून वाहनचालकावर गुन्हा नोंद केला. वाहनातील सर्व गोवंश अंबाजोगाई येथील जैन गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले.
१. अन्य एका कारवाईत लातूर येथून सोलापूरमार्गे पाटोदा गावात एका चारचाकी वाहनातून ८ गोवंशियांना नळदुर्ग येथील पशूवधगृहाकडे नेण्यात येत होते. यातील सर्व गोवंशियांना सोलापूर येथील अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले आहेत. यातील १ खिल्लार जातीचा बैल आणि १ म्हशीचे रेडकू हे मृतावस्थेत आढळले. संबंधित वाहनचालकाच्या विरोधात मानद पशू कल्याण अधिकारी प्रशांत परदेशी यांनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
२. ही कारवाई करण्यासाठी धाराशिव येथील खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव ग्रामीण पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, धाराशिव ग्रामीण उपायुक्त नवनीत कुंवत, पोलीस उपअधीक्षक बरकते, सोलापूर येथील बजरंग दलातील गोरक्षकांचे मार्गदर्शक आणि मानद पशूकल्याण अधिकारी श्री. महेश भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
३. दोन्ही कारवाया यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभाग सोलापूर जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, शहर प्रमुख अविनाश कैय्यावाले, गोरक्षक सर्वश्री पवनकुमार कोमटी, दिनेश धनके, विनायक निकते आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले.