युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन !

‘नेटवर्क एटीन’च्या पत्रकार शुभांगी शर्मा यांनी प्रखर शब्दांत केला निषेध !

हिंदूंचे आराध्यदैवत श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन

“हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक”

नवी देहली – युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हिंदूंचे आराध्यदैवत श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन केले आहे. ‘कलेचा नमुना’ असे लिहीत संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर खात्याने एक चित्र ट्वीट केले आहे. या चित्रात डाव्या बाजूला एका शहरावर बाँबद्वारे आक्रमण झाल्याने भूमीपासून आकाशापर्यंत स्फोट आणि त्यामुळे पसरलेला धूर असल्याचे छायाचित्र आहे, तर उजव्या बाजूला श्री कालीमातेला ‘कॅबरे डान्सर’च्या रूपात दाखवून धुराचा आकार देण्यात आला आहे. या चित्रामुळे १०० कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्याचे ट्वीट ‘नेटवर्क एटीन’च्या पत्रकार शुभांगी शर्मा यांनी केले आहे.

पत्रकार शुभांगी शर्मा यांनी म्हटले आहे की,

१. जगभरातील १०० कोटी हिंदूंविषयी युक्रेनी सरकार एवढा द्वेष बाळगते आणि त्यांना हीन लेखते, हे पाहून दु:ख झाले. जे राष्ट्र युद्धामुळे पीडित झाल्याचा दावा करते, त्याने असे करणे पूर्णत: अयोग्य आहे.

२. श्री कालीमातेचे विडंबन करण्याऐवजी दुष्टतेवर विजय प्राप्त करण्यासाठी युक्रेनने तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. युक्रेनला या क्षणाला याचाच खर्‍या अर्थाने लाभ होईल.

३. श्री कालीमातेविषयी शेकडो वर्षांपासून असलेली घृणा पाश्‍चात्त्यांच्या मनात अजूनही आहेच. अज्ञान आणि धर्मांधता यांचेच हे प्रतीक आहे. त्यांच्या मनात कायमस्वरूपी रुजलेला पूर्वग्रह कधीच नष्ट होणार नाही.

४. मला आशा आहे की, युक्रेनला सद्बुद्धी व्हावी; कारण अजूनही त्याचे बरेच काही सुरक्षित आहे.

संपादकीय भूमिका

युद्धग्रस्त युक्रेन एका बाजूला हिंदूबहुल भारताकडे साहाय्याची याचना करतो, तर दुसर्‍या बाजूला श्री कालीमातेचे अश्‍लाघ्य विडंबन करतो. खरेतर युक्रेनची विचारसरणी नेहमीच पाकधार्जिणी आहे. त्यामुळेच त्याने ही हिंदुविरोधी गळओक केली आहे. त्यामुळे अशा युक्रेनला आता धडा शिकवण्याचीच ही वेळ आहे !