भारत बनला युरोपमधील तेलाचा सर्वांत मोठा पुरवठादार देश !

नवी देहली – भारत हा युरोपमधील शुद्ध केलेल्या तेलाचा (‘रिफाइन्ड ऑइल’चा)  सर्वांत मोठा पुरवठादार देश बनला आहे. ‘केपलर’ या आस्थापनाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार भारताकडून युरोपला प्रतिदिन ३ लाख ६० सहस्र बॅरेल तेल निर्यात केले जात आहे. यामुळे आता भारताने साऊदी अरेबियालाही मागे टाकले आहे. दुसर्‍या बाजूला भारताने रशियाकडूनही कच्चे तेल विकत घेण्यामध्ये विक्रम स्थापित केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे रशियावर युरोपीय संघातील बहुतेक देशांनी निर्बंध लादले आहेत. याअंतर्गत युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल विकत घेत नाहीत. आतापर्यंत युरोप रशियाच्या तेलावर पुष्कळ प्रमाणात अवलंबून होता; परंतु अमेरिका आणि अन्य शक्तीशाली पाश्‍चात्त्य देशांच्या दबावामुळे बहुतेक युरोपीय देशांवर रशियाकडून तेल खरेदी करण्यावर बंधने आली. त्यामुळे त्या सर्व देशांनी भारताकडून शुद्ध केलेले तेल मोठ्या प्रमाणात आयात करण्यास आरंभ केला आहे.

याआधी भारतावरही रशियाकडून तेल आयात करू नये, अशा प्रकारे निर्बंध लादण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; परंतु भारताने वेळोवेळी बाणेदारपणा दाखवत हे निर्बंध झुगारले. भारताने म्हटले होते की, आमच्यासाठी आमच्या नागरिकांच्या हिताला प्रथम प्राधान्य असून त्यासाठी आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत. यांतर्गतच पाश्‍चात्त्य देशांची अरेरावी झुगारत भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करण्यास आरंभ केला.