लुधियाना (पंजाब) येथे वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू

लुधियाना (पंजाब) – येथील ग्यारसपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील एका इमारतीत  ३० एप्रिलला सकाळी ७.१५ वाजता झालेल्या वायू गळतीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ मुलांसह ५ महिला आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. मुले १० आणि १३ वर्षांची आहेत.  वायू गळतीच्या घटनेमुळे अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन हा संपूर्ण परिसर बंद केला. या वायू गळतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

१. येथील आमदार राजिंदरपाल कौर यांनी सांगितले की, या इमारतीत दूध विक्री केंद्र होते.जो कुणी सकाळी येथे दूध घेण्यासाठी गेला, तो बेशुद्ध पडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झालेल्या इमारतीच्या ३०० मीटर परिसरात लोक बेशुद्ध पडले आहेत. कुठल्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय ?, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

२. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, ही घटना वेदनादायी आहे. पीडितांना सर्व प्रकारचे साहाय्य केले जात आहे.