‘एन्.सी.बी.’कडून गोव्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई

रशियाची माजी ऑलिंपिकपटू आणि निवृत्त पोलीस अधिकारी कह्यात !

‘एन्.सी.बी.’ची कारवाई – रशियाची माजी ऑलिंपिकपटू आणि निवृत्त पोलीस अधिकारी कह्यात

पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (‘नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो’ने -‘एन्.सी.बी.’ने) गोव्यात मांद्रे, पेडणे येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. तसेच या कारवाईत माजी रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा (जलतरणपटू), आंद्रे हा निवृत्त रशियन पोलीस अधिकारी आणि आकाश नामक एक स्थानिक व्यक्ती यांना कह्यात घेण्यात आले आहे.

संशयितांकडून कह्यात घेण्यात आलेले अमली पदार्थ हे विविध प्रकारचे असून ते निरनिराळ्या पद्धतीने लपवून ठेवण्यात आले होते. संशयित रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा या माजी ऑलिंपिकपटू असून तिने वर्ष १९८० मध्ये रौप्यपदक पटकावले होते. संशयित तथा रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे याचा अमली पदार्थ जगताशी संबंध आहे. हे दोघेही संशयित काही दिवसांपूर्वी गोव्यात आले होते आणि मांद्रे येथे वास्तव्यास होते. स्थानिक नागरिक आकाश हा अमली पदार्थांच्या मोठ्या जाळ्याचा एक भाग आहे. तो गोव्यातील रशियन अमली पदार्थ व्यवहाराचा प्रमुख आहे.